मंचरच्या ‘माणूस’ परिवाराची दहा वर्षांपासून व्यसनमुक्ती मोहीम

पिंपरी : धांगडिधगा करून, दारू पिऊन ‘थर्टी फस्र्ट’ साजरा करण्याच्या प्रवृत्तीला छेद देण्यासाठी मंचरच्या ‘माणूस’ परिवाराकडून गेल्या १० वर्षांपासून ३१ डिसेंबरला व्यसनमुक्ती मोहीम राबण्यात येते. दारूऐवजी दूध प्या, असे आवाहन करतानाच अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात येते. यंदा व्यसनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नववर्षांचे स्वागत करून त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न केला.

माणूस परिवाराकडून वर्षांच्या शेवटच्या दिवशी व्यसनमुक्तीचे विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. त्याअंतर्गत नागरिकांना दारू न पिण्याचे, तथा त्याऐवजी दूध पिऊन नववर्षांचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात येत होते. दारूच्या बाटल्या नष्ट करणे, व्यसनाधीन व्यक्तींना व्यसन सोडायला लावणे, व्यसनमुक्तीवर व्याख्याने आयोजित करणे, व्यसन सोडलेल्या नागरिकांचे सत्कार घेणे आणि सरतेशेवटी दुधाचे वाटप असे कार्यक्रम ३१ डिसेंबर रोजी आयोजित केले जातात.

यंदाही काही वेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचा  संस्थेचा प्रयत्न होता. त्यानुसार, बाजारपेठेतून व्यसनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यात परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. जनजागृती करणारे फलक नागरिकांच्या हातात होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि भजने गात निघालेल्या या अंत्ययात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. कवी उद्धव कानडे आणि हास्यकवी बंडा जोशी यांच्या व्यसनमुक्तीवर आधारित कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. तेही या उपक्रमात सहभागी झाले होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे. के. वाबळे एकदा कार्यक्रमासाठी मंचरला आले होते. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली. सर्वप्रथम तंबाखूविरोधात नागरिकांमध्ये जागृतीचा प्रयत्न केला. तेव्हापासून दरवर्षी ‘माणूस’ परिवाराच्या वतीने व्यसनमुक्तीचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. – अजय घुले, आयोजक, माणूस परिवार, मंचर