पुणे शहरातील करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, १३ ते २३ जुलै दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाघोली, बालेवाडी, सणस मैदान आणि हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर या चार ठिकाणी मिळून तीन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, “पुणे शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २५ हजाराहून अधिक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी शहरात रुग्ण संख्या कमी होण्याच्या दृष्टीने अनेक सूचना केल्या असून १३ ते २३ जुलै दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्या दहा दिवसाच्या कालावधीत कोणत्या गोष्टी सुरू राहणार, याबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे.” लॉकडाऊन पूर्वी येत्या दोन दिवसात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं. यामुळे करोनाची साखळी तुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या शहरात दररोज हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळात बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीची तपासणी करून, २४ तासाच्या आतमध्ये रिपोर्ट देणे यावर आमचं लक्ष असणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. शहरात अनेक रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका ६०० ऑक्सिजन बेड पुढील आठ दिवसात उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तपत्रासाठी या लॉक डाऊनच्या काळात सवलत देण्यात आली असल्याचं आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.