मध्यवर्ती भागातील शाळांना घटत्या पटसंख्येचा फटका

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी विद्यार्थ्यांनी बहरलेल्या नामांकित शाळांनाही आता घटत्या विद्यार्थी संख्येच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी या शाळांतील शिक्षकही अतिरिक्त ठरत असल्याचे चित्र समोर आले असून, विशेष म्हणजे घटत्या विद्यार्थी संख्येचा, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा बहुतांशी  फटका अनुदानित शाळांनाच बसत आहे.

जिल्हा परिषदेने २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार तयार केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून ही माहिती स्पष्ट झाली आहे.अतिरिक्त ठरलेल्या ९९ शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक मराठी माध्यमाच्या शाळांतील आहेत. जुन्या व नामांकित शिक्षण संस्थांच्या शाळा मध्यवर्ती भागांमध्ये आहेत. त्यात नूमवि प्रशाला, आगरकर मुलींचे हायस्कूल, पीव्ही कन्या प्रशाला, अत्रे दिनप्रशाला, शिंदे हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, अशोक विद्यालय, अशा काही शाळांचा समावेश आहे. एकेकाळी या शाळांची पटसंख्या बरीच मोठी होती,  प्रवेशासाठी बरीच गर्दीही होत होती. मात्र, आताच्या घडीला या शाळांचीही पटसंख्या कमी होत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरू लागले आहेत. ‘मध्यवर्ती भाग पूर्वीच्या तुलनेत आता अधिक व्यावसायिक होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील वस्ती कमी होऊन उपनगरांत वस्ती वाढत आहे.  विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत,’ असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.

शाळांची पटसंख्या

* घटण्याची प्रमुख कारणे

* इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असलेला पालकांचा ओढा

* विस्तारलेल्या शहरातील उपनगरांमध्ये वाढत्या शाळा

* मध्यवर्ती भागातील वाढती गर्दी

* वाहतुकीच्या अडचणी

* गुणवत्तेबाबत असलेला प्रश्न

मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या हा चिंतेचा विषय आहे. मराठी माध्यमाच्या शाळा चालवणाऱ्या संस्थांसमोर पटसंख्या टिकवणे हे एक आव्हानच आहे. पटसंख्या टिकवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा असलेला ओढा हे पटसंख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. मातृभाषेतून शिक्षण न झाल्यास त्याचा मुलांच्या आकलन शक्तीवर विपरित परिणाम होतो, हे पाश्चात्त्य देशांतील संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे.

– अ‍ॅड. नंदू फडके, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ