माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केल्यानंतर त्यांचं नावं जास्त चर्चिलं गेलं. त्यावरून त्या ट्रोलही झाल्या. या सगळ्या घटनेवर राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका मांडली. विशेष म्हणजे अमृता फडणवीस ट्रोल होण्याच कारणही त्यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा सर्वश्रुत आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेक विषयांवरून सवाल उपस्थित केले होते. त्यावरून शिवसेनेनं थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. या सगळ्या प्रकरणासंदर्भात अदिती तटकरे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांची भूमिका मांडली.

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मिसेस अमृता फडणवीस यांना ट्विटरवर अनेकदा ट्रोल केले जाते,’ असा प्रश्न राज्यमंत्री अदिती तटकरे यांना विचारण्यात आला. तटकरे म्हणाल्या,’ट्रोलिंग हा प्रकार काही नवीन नाही. वैयक्तिक स्वातंत्र्य असल्याने आपण मत मांडू शकतो. मग तो राजकारणी असू दे की, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती. राजकीय परिस्थितीनुसार आपली मतं मांडली जातात. त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडले आहे. ज्यांना पटतं ते लाईक करतात आणि ज्यांना अधिक पटत नाही ते ट्रोल करतात. जस मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसं ट्रोल करण्याचाही फॉलोअर्संना अधिकार असतो,’ असं अदिती म्हणाल्या.

महिला सुरक्षेचं काय? अदिती म्हणाल्या…

‘महिलांची सुरक्षितता हा राज्याला आणि देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. याविषयी जागरूकता होणं गरजेचं आहे. दिशा कायदा लागू होत असताना अधिक कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून दुसऱ्या राज्यातील गृहमंत्री यांना इथं येण्याची वेळ येईल. पुरुषांची जी महिलांकडे बघण्याची पद्धत आहे किंवा मानसिकता आहे, यात सुधार होणं गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात महिला सुरक्षेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आलं आहे,’ अशी माहिती अदिती तटकरे यांनी बोलताना दिली.