निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त; तक्रारींबाबत विभागीय आयुक्तांकडून जिल्हा प्रशासनाला सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्तालयाकडून नियुक्त करण्यात आले आहेत. याबरोबरच लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे आणि मतदान स्थळे, मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे यासह आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पीएमआरडीएच्या अपर जिल्हाधिकारी कविता द्विवेदी, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बारामतीसाठी पुण्याचे अपर आयुक्त सुभाष डुंबरे, शिरुरसाठी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यतील कर्जत, पनवेल व उरण विधानसभा मतदार संघाचा समावेश मावळ  लोकसभा मतदार संघात आहे. शहरासह जिल्ह्य़ातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आठ प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी, मदत कक्ष, स्वच्छतागृह, वीज, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प आदी सुविधांचा समावेश आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियानांतर्गत जिल्ह्य़ातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले असून या यादीनुसार दिव्यांग मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त  तथा मतदार नोंदणी निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विविध पथकांची स्थापना

निवडणूक विषयक विविध कामांसाठी विविध पथके स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये खर्च देखरेख, छायाचित्रणकार, सूक्ष्म निरीक्षक, विभागीय अधिकारी, भरारी पथके, एसएसटी (स्थिर पथके), निवडणूक केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण आणि पाहणी पथक, लेखा पथक नियुक्त करण्यात येत आहे. आचारसंहिता भंगाच्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप उपलब्ध होणार आहे. तसेच एनजीआरएस सिस्टीम ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सैन्यात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सव्‍‌र्हिस) यंदा नव्याने उपलब्ध होणार आहे.

लोकसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रे आणि स्थळे

पुणे जिल्ह्य़ात शहरी भागात चार हजार ४०४, तर ग्रामीण भागात तीन हजार २६२ अशी एकूण सात हजार ६६६ मतदान केंद्रे आहेत. तर, शहरी भागात ८४९ आणि ग्रामीण भागात दोन हजार १२७ अशी एकूण दोन हजार ९७६ मतदान स्थळे आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात दोन हजार ४०५ मतदान केंद्रे, तर ७१५ मतदान स्थळे आहेत. पुणे लोकसभा मतदार संघात एक हजार ९४४ मतदान केंद्रे, तर ३६३ मतदान स्थळे आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात दोन हजार ३०३ मतदान केंद्रे, तर एक हजार ३३० मतदान स्थळे आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात दोन हजार २२७ मतदान केंद्रे, तर ९४५ मतदान स्थळे आहेत.