पश्चिम महाराष्ट्रात प्रशासन, व्यवस्था आजारी

पुणे : अपुरी आणि अशक्त होत चाललेली उपचार-साथरोग नियंत्रण व्यवस्था सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांत दिसत आहे. अपुऱ्या खाटांसह उपचार करणारी तोकडी यंत्रणा, मर्यादित रुग्णवाहिका-सुरक्षा साधने, टाळेबंदीनंतर पोलिसांमध्येही आलेली शिथिलता हे या जिल्ह्य़ांमधील करोनालढय़ातील कच्चे दुवे ठरत आहेत. त्यामुळे आधी नियंत्रणात असलेला करोना उलट-सुलट निर्णयांमुळे आणि प्रशासनातील ढिलाईमुळे गंभीर रूप धारण करू लागला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या पाच जिल्ह्य़ात करोना बाधितांचे प्रमाण आधी काहीसे नियंत्रणात होते. यामध्ये सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात तर सुरुवातीचे कित्येक दिवस करोनाचा शिरकावच नव्हता. परंतु पुढे करोनाग्रस्त भागाकडून बाधितांचे संक्रमण सुरू झाले आणि येथील स्थिती साथग्रस्त होत गेली.

सोलापुरातील मृत्यूच्या संख्येबाबतचा गोंधळही सर्वत्र गाजला. रुग्णालय आणि प्रशासनातील समन्वयाअभावी इथल्या ४० मृतांची नोंदच झालेली नसल्याचे उघड झाल्यावर सर्वत्र खळबळ उडाली होती.

एकटय़ा सांगली जिल्ह्य़ाची आकडेवारी पाहिली तर ही गोष्ट प्रकर्षांने जाणवेल. इथे आजवर झालेल्या एकूण १५ करोनामृत्यूंपैकी तब्बल आठ जण हे बाहेरील आहेत.

कोल्हापुरातील करोना रुग्णालयात औषधांची उपलब्धता आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, ही जमेची बाजू वगळता बाकी परिस्थिती बिकट आहे. बैठक, भेटीच्या नावाखाली वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाबाहेर, तर उपचारांची लढाई कनिष्ठांवर सोडून दिलेली आढळते. नुकतेच इथे औषधांच्या खरेदीतील गैरव्यवहार एका सामाजिक सेवा संस्थेने उघडकीस आणल्याने करोना संकटात भ्रष्टाचाराची कीडही पोखरू लागली असल्याचे स्पष्ट झाले.

नगर जिल्ह्य़ातही प्रशासकीय ढिलाई आहे. करोनामुळे जिल्ह्य़ात आजवर २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकटय़ा संगमनेरमध्ये १२ जणांचे बळी गेले आहेत. मात्र यातील एकाही मृत्यूची माहिती जिल्हा प्रशासनाने स्वत: जाहीर केलेली नाही.

टाळेबंदी शिथिल केल्यावर लोकांचे वर्तन बेछूट झाले आहे. रस्ते, चौक, बाजारपेठा, मंडई या प्रत्येक ठिकाणी लोक नेहमीप्रमाणे गर्दी करत आहेत.

अपुऱ्या रुग्णवाहिका

साताऱ्यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. परंतु या रुग्णांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आणण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. दुर्गम भागातील या रुग्णांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आणण्यासाठी खासगी वाहनेही कुणी देत नाही. रुग्णवाहिका मिळाली तरी ती चालवण्यासाठी चालक मिळत नाहीत. या साऱ्यामुळे रुग्णास उपचार मिळण्यास उशीर होतो आहे.

नगरमध्ये एकच रुग्णालय

भौगोलिकदृष्टय़ा नगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असताना इथे गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ नगर शहरातच सोय आहे. यामुळे अनेकदा अकोले, संगमनेर किंवा जामखेड सारख्या दूर अंतरावरून येणारा रुग्ण वाटेतच गंभीर बनतो आहे. या अशा जिल्ह्य़ात अन्य दोन ठिकाणी तरी गंभीर रुग्णांवर उपचारांची सोय करण्याची गरज आहे.

छुप्या शिरकावामुळे..

सातारा आणि सांगलीत टाळेबंदीच्या काळात आवाक्यात असलेला करोना पुढे शिथिलीकरणानंतर हाताबाहेर जाऊ लागला. यातील बहुतांश रुग्ण हे जिल्ह्य़ाबाहेरून आलेले असल्याने सीमेवरील तपासणीमध्ये पाणी मुरत असल्याचे उघड होत आहे. एका बाजूला बाधितांवरील उपचारयंत्रणा रात्रंदिवस लढत असताना हा छुपा शिरकाव सातारा, सांगलीतील आकडे रोज वाढवत आहे. पाचही जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे पुण्या-मुंबईतून शिरकाव केलेले आहेत. छुपे स्थलांतर नवी डोकेदुखी बनली आहे

व्यवस्था तोकडी..

पश्चिम महाराष्ट्रात तीन महिन्यांत सोलापूर जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या घरात, तर मृत्यूचा आकडाही ३३० वर पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या या आणि अन्य खासगी रुग्णालयांमध्ये मिळून १३५० खाटा उपलब्ध आहेत. मात्र रोज शंभरच्या पटीत निष्पन्न होणारे रुग्ण पाहता ही व्यवस्था कधीच संपुष्टात आली आहे.