प्रथमेश गोडबोले

प्रवाशांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या याबरोबरच पीएमपीबाबत कोणत्याही प्रकारची समस्या थेट प्रवाशांकडूनच जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडून ‘प्रवासी दिन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  पीएमपीचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. प्रवासी, सर्वसामान्य नागरिक या कक्षाकडे दूरध्वनी किंवा प्रत्यक्षात जाऊन तक्रार करु शकतात. याबरोबरच ई-कनेक्ट अ‍ॅपवरही तक्रार करण्याची सुविधा आहे. जे प्रवासी तक्रार करतात त्याची दखल प्रशासनाकडून गांभीर्याने घेतली जात नाही किंवा त्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासी दिनात उपस्थित राहून तक्रारी कराव्या लागतात. अर्थात त्यातीलही तक्रारींचे निराकरण होत नाही असा अनुभव आहे.

कोणत्याही शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रवाशांच्या दृष्टीने स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, सक्षम आणि भरवशाचीच असायला हवी. परंतु, आजची पुण्यातील पीएमपीची सेवा सर्वच दृष्टीने कोलमडलेली आहे. जागोजागी बस बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. थांब्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वेळापत्रकानुसार बस कधी धावतच नाहीत. खिडक्यांच्या काचा धड नाहीत. दरवाजे, आसने तुटलेली, चालकासमोरच्या काचांना तडे गेलेले, बसमधील छत तुटलेले, गळके, आयुर्मान संपलेल्या बसगाडय़ा तशाच रस्त्यांवर आणल्या जातात. या आणि अशा इतर अनेक गोष्टींमुळे पीएमपीच्या प्रवाशांपुढे अनेक समस्या निर्माण होतात.

भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाडय़ांकडे तर प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असणारी प्रथमोपचार पेटी आणि आगरोधक यंत्रणा अनेक गाडय़ांमध्ये नसते. क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रवासी बसमध्ये घेऊन वाहतूक केली जाते. त्यामुळे फुकटे प्रवासी आणि चोऱ्या करणाऱ्यांचे फावते. या सर्व समस्यांबाबत प्रवाशांकडून वेळोवेळी तक्रारी केल्या जातात. मात्र, त्यांची दखल घेण्याऐवजी तक्रारींकडे दुर्लक्षच केले जाते. एखादे प्रकरण खूप वाढले तरच यंत्रणा हलते. गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी सुटे भाग उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे गाडय़ा बंद ठेवाव्या लागतात, हे प्रशासनाचे ठेवणीतले नेहमीचे उत्तर. पण हा प्रश्न एका दिवसात उद्भवला का?, यावर प्रशासनाकडे उत्तर नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी प्रशासनाकडून ‘प्रवासी दिन’ सुरू करण्यात आला आहे.

‘सद्य:स्थितीत प्रतिदिन १० लाखांपेक्षा अधिक प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. याबरोबरच शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे सुरू असलेले काम, स्मार्ट सिटी अंतर्गत दोन्ही महापालिकांची रस्ते, पदपथांची सुरू असलेली कामे, अतिक्रमणे अशा विविध कारणांनी रस्ते अरूंद होऊन वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे नियमित वेळापत्रकाप्रमाणे आणि प्रवाशांच्या गरजेनुसार बस संचलन करण्यात पीएमपीला समस्या येत आहेत’, या पीएमपीच्या उत्तरात काही प्रमाणात तथ्य असले, तरी मेट्रो आणि स्मार्ट सिटीची कामे सुरू होण्याआधीही बसथांबे व्यवस्थित नसणे, गाडय़ांची संख्या कमी असणे, थांब्यावर गाडी न थांबणे, चालक-वाहकांचे उद्धट वर्तन, विशिष्ट मार्गावर गाडीचे सातत्याने ब्रेक निकामी होणे अशा अनेक समस्या वर्षांनुवर्षे कायम आहेत.

‘प्रवासी दिन’ हा उपक्रम नव्याने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत पीएमपी आगारात होणार आहे. त्यानुसार पहिला प्रवासी दिन जून महिन्याच्या पहिल्या शनिवारी पार पडला. तर, दुसरा येत्या शनिवारी (६ जुलै) होणार आहे. त्या दिवशी प्रत्येक आगारातील आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे सोपे जाईल, हा त्या मागचा उद्देश आहे. सन २०१४ मध्ये हा उपक्रम पीएमपीने सुरू केला होता. तो दोन वर्षांतच बंद पडला. सन २०१६ आणि २०१७ मध्ये हा उपक्रम पुन्हा सुरू होऊन पुन्हा बंद पडला. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रशासन किती तत्परता दाखवणार हा प्रश्न आहे. यापूर्वी सुरू केलेल्या प्रवासी दिनासाठी ठिकठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. प्रवाशांनी सांगितलेल्या अडचणी, तक्रारी नोंदवून घेत त्याचे तातडीने निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश होता. या सर्व तक्रारींची दखल काही प्रमाणात घेतली जायची. मात्र, त्यामध्ये प्रशासनाला सातत्य  टिकवता आले नाही. पीएमपीवर नवा अधिकारी नियुक्त झाल्यानंतर प्रवासी दिनाची चर्चा होते. तो सुरू केला जातो. ‘नव्याचे नऊ दिवस’ झाल्यानंतर तो पुन्हा बासनात बांधला जातो. हेच आतापर्यंत घडत आले आहे.

आता नव्याने सुरू केलेल्या प्रवासी दिनाच्या उपक्रमात केवळ आगार प्रमुखांच्या कार्यालयात प्रवाशांच्या तक्रारी, सूचना ऐकून घेतल्या जाणार आहेत. दर महिन्याला या दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवाशांना थेट अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. बस, मार्ग, चालक, वाहक, नियंत्रक, तपासनीस, दुरुस्ती देखभाल करणारे कर्मचारी यांसह कोणत्याही बाबतीत सूचना, तक्रारी करता येणार आहेत. या तक्रारींवर तत्काळ चौकशी आणि कारवाई होणार आहे. तसेच तक्रारींची दखल घेऊन मध्यवर्ती कार्यालयाकडून त्याचा निपटारा केला जाणार आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. असे खरोखरच झाल्यास पीएमपीच्या कारभारात नक्कीच सुधारणा होईल. तसे झाले नाही तर मात्र प्रवासी दिन म्हणजे केवळ उपक्रमापुरता उपक्रम असेच ठरेल.