करोना विषाणूनं भारतात प्रवेश केला. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, प्रशासनानं त्यांची नावं उघड न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांकडून सोशल मीडियात करोनाचा संसर्ग झालेल्यांची नावं पसरवली जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक भूमिका घेतली असून, अशा पद्धतीनं नावं उघड करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी ही माहिती दिली.

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. सुरूवातीला पुण्यात एका दाम्पत्याला संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना याची लागण झाली. पुण्यापाठोपाठ मुंबई दोन, तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, हे रुग्ण राहत असलेल्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

नागरिकांकडून करोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना वेगळी वागणूक देण्याचाही प्रकार काही ठिकाणी घडला. मात्र, त्यापूर्वीच पुणे विभागीय प्रशासनानं करोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सोशल माध्यमातून त्यांची नावं जाहीर केली जात आहे. यात पुण्यातील काही रुग्णांची नावं व्हायरल झाली. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा’ असं म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक निर्णय घेतला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

‘आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावं उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवावं. कोणीही नावं उघड करता कामा नये, असे आम्ही पहिल्या दिवसांपासून आवाहन करीत आहोत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने नावं पसरवणाऱ्यांवर पोलीस विभागाचे सायबर सेल लक्ष ठेऊन आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितलं.