पुणे : जिल्ह्य़ातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार बारामती, पुरंदर, हवेली, दौंड, वेल्हे, आंबेगाव तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी के ली आहे. जिल्ह्य़ातील एकूण ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार असून टप्प्याटप्प्याने या बाबतचे आदेश प्रसृत के ले जाणार आहेत.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत नमूद केले आहे. प्रशासक संबंधित गावातील रहिवासी असावा, त्याचे मतदार यादीत नाव असावे, अशा अटी टाकण्यात आल्या होत्या. सरपंचपदाचे सर्वाधिकार या प्रशासकाला देण्यात आले आहेत. तसेच सरपंचपदाचे मानधनही त्यांना दिले जाणार आहे. सरपंच आणि सदस्यांना प्रशासक होता येणार नाही, असे निकष ग्रामविकास विभागाने जाहीर के ले आहेत. या पाश्र्वभूमीवर ज्या पक्षाचा सरपंच, त्या पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे प्रशासकपदी वर्णी लावण्याबाबत धोशा लावला होता.

दरम्यान, ग्रामपंचायतींवर राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याऐवजी सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने सरकारी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. परिणामी राजकीय कार्यकर्त्यांची निराशा झाली असून, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

‘जिल्ह्य़ातील ७५० ग्रामपंचायतींची मुदत टप्प्याटप्प्याने संपणार आहे. त्यामुळे १४०० पैकी ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त के ले जाणार आहेत. यापैकी गेल्या आठवडय़ात सात ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त के ले आहेत. काही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे १३० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश प्रसृत के ले आहेत’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

हवेलीतील ग्रामपंचायतींवर सर्वाधिक प्रशासक

जिल्ह्य़ात सर्वाधिक ४७ प्रशासक हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त के ले आहेत. बारामती तालुक्यात पाच, पुरंदरमध्ये २९, दौंड २६, वेल्ह्य़ात १२ आणि आंबेगावात दहा अशा १३० प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांचा प्रशासक म्हणून समावेश आहे.