पैकीच्या पैकी गुण मिळालेले, अव्वल स्थानी आलेले, विशेष प्राविष्य मिळवलेले.. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार नेहमीच होत असतो. पण, परिस्थितीशी झगडून कमी गुण मिळवून कसेबसे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्याकडे कोणी पाहायचे? आणि त्यांना प्रेरणा ती कोणती?..
वीर लहुजी मित्र मंडळ आणि विरेश्वर महाराज मठ यांनी या विद्यार्थ्यांसाठी असाच एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. केवळ उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
वडारवाडीतील वीर लहुजी मित्र मंडळाने, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नावनोंदणी करावी, असा फलक लावला होता. त्यासंदर्भात एक कार्यक्रम पत्रिकाही तयार करुन घराघरात वाटली. नावनोंदणी झालेल्यांमध्ये ३८ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपासून ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ६० जणांचा समावेश होता. मंळातर्फे या सर्वाचा सत्कार करण्यात आला.
वस्तीत राहणाऱ्या मुलांची परिस्थिती खूप हलाखीची असते. त्यांना शिक्षणासाठी पूरक वातावरण नसते. ही मुले आठवी, नववीच्या पुढे शिकत नाहीत. समाजाचा या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो. त्यामुळे आपण कमी आहोत अशी भावना या मुलांच्या मनात कुठेतरी बळावते. याच कारणामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला; मग गुण कितीही असोत. विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वह्य़ा, पेन व अवांतर वाचनासाठी चांगली मूल्ये देणारी गाजलेली पुस्तके देण्यात आली.
दहावी, बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांना पडतो. वस्तीतील मुलांना यासंदर्भात मार्गदर्शन करणारे कोणीच भेटत नाही, म्हणून मंडळाच्या वतीने सत्कार समारंभानंतर मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कनिष्ठ वैज्ञानिक व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. निश्चय म्हात्रे, लोकायत संघटनेचे कार्यकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी, रत्नागिरीतील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिवाजी सागडे आदींनी विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले. म्हात्रे यांनी दहावी, बारावीनंतर खुल्या असलेल्या विविध व्यवसायांबद्दल मार्गदर्शन केले. ‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे परस्पर सहकार्य गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी दशेतला जास्तीत जास्त वेळ दर्जेदार साहित्य वाचनाला द्या आणि त्यासाठी ग्रंथालयांचा पुरेपुर फायदा करुन घ्या,’ असे ते म्हणाले. ‘शिक्षणाची व्याख्या गणित, विज्ञानापुरती मर्यादित न ठेवता त्याला सर्वागीण विकासाशी जोडणे आवश्यक आहे,’ असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.