तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे दळणवळणावर परिणाम झाल्याने प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिलेल्या मुदतीत प्रवेश घेणे काही विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या (डिप्लोमा) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) घेतला आहे. प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक डीटीईच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

सध्या दहावी, बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अशा तीनही पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या तीनही अभ्यासक्रमांची तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश होत आहेत.

तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ९ ऑगस्टपर्यंत जवळच्या ‘एआरसी’ केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या मुदतीत प्रवेश घेता आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश निश्चितीसाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, तीनही पदविका अभ्यासक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे.

या पूर्वी सर्व प्रवेश प्रक्रिया १९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची सूचना संस्थांना देण्यात आली होती. आता २२ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.    – डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण संचालक