पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असून शाळांमध्ये माहिती पुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. माहिती पुस्तकात देण्यात आलेला लॉग इन अ‍ॅड्रेस वापरून विद्यार्थी अर्जाचा पहिला टप्प भरू शकणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ मे पासून सुरू होणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. शाळांमध्ये माहिती पुस्तकाचे वितरण सुरू झाले आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना शंभर रुपये देऊन हे माहिती पुस्तक घेता येणार आहे. बहि:स्थ विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोंदणी केंद्रातून अकरावीचे माहिती पुस्तक घ्यायचे आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय मदत केंद्रांमधून अर्ज घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवून माहिती पुस्तक घ्यायचे आहे.
ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्याची सुरुवात १६ मे पासून होणार आहे. विद्यार्थ्यांनी खासगी शिकवण्या किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू नये, तर तो शाळेतूनच भरण्यात यावा, अशी सूचना अकरावी केंद्रीय समितीने माहिती पुस्तकात दिली आहे.

काय काळजी घ्याल?
* अर्जाबरोबर लॉगइन आयडी आणि पासवर्ड असलेले पाकिट आहे याची खातरजमा करा
* लॉगइन आयडी आणि पासवर्ड जपून ठेवा
* माहिती पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे. त्यापेक्षा अधिक किमतीला विक्री होत असल्यास शिक्षण विभागाला त्याची माहिती द्या
* माहिती पुस्तक घ्यायला जाताना दहावीचे प्रवेशपत्र बरोबर ठेवा
* http://www.dydepune.com// या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबतच्या सूचना, माहिती, विभागीय मदत केंद्र, संपर्क क्रमांक आदी माहिती उपलब्ध आहे.

पहिल्या दिवशी शाळा शांतच
माहिती पुस्तकांची विक्री सुरू झाली तरी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सुट्टय़ांमध्ये विद्यार्थी गावाला जातात, दहावीची परीक्षा झाल्यावर ते नियमितपणे शाळेशी संपर्कात नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही माहिती पुस्तकांची विक्री सुरू झाली असल्याचे पोहोचलेले नाही. त्यामुळे सोमवारी बहुतेक शाळांमध्ये शांतताच होती.