पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया आता निर्बंध शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर के ली. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधामुळे सध्या प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे.

‘गेल्या वर्षी देशव्यापी टाळेबंदी सुरू असताना प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सध्या खासगी आस्थापने बंद ठेवण्याचे आणि शासकीय कार्यालयांत १५ टक्के  उपस्थितीचे निर्बंध आहेत. तसेच संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होणार नाही. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरच कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश सुरू के ले जातील,’ असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रवेश जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया काही काळ लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे.