राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने सुरू केलेल्या वन्य प्राणी दत्तक योजनेत काही विशिष्ट प्राणीच दत्तक घेण्यास नागरिक उत्सुक असून यात बिबटय़ा आणि त्याखालोखाल वाघ दत्तक घेण्यास सर्वाधिक मागणी आहे. काही वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यास मात्र कुणीच तयार नसल्याचे चित्र आहे.
प्राणी दत्तक योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत एकूण ८१ नागरिकांनी या योजनेत प्राणी दत्तक घेतले असून याद्वारे २० लाख २८ हजार रुपयांची रक्कम जमा झाली. यात सर्वाधिक म्हणजे २० वेळा बिबटय़ाला दत्तक घेतले गेले आहे, तर त्या खालोखाल १७ वेळा वाघाला दत्तक घेण्यात आले. सापांनाही ७ वेळा दत्तक घेतले गेले. मोर, मगरी आणि कासवांनाही दत्तक घेण्यास चांगली मागणी आहे. अगदी हत्तीलाही दत्तक घेण्यात आले आहे. माकड, साळिंदर, भेकर, नीलगाय आणि घोरपडीसारख्या सरडा परिवारातील प्राण्यांना मात्र आतापर्यंत कुणीही दत्तक घेतलेले नसल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाच्या प्रशिक्षण अधिकारी अश्विनी शितोळे यांनी दिली.
संचालक सुरेश जगताप म्हणाले, ‘‘प्राणी दत्तक योजनेत काही नागरिक योगदान देत असले, तरी या योजनेस समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. पूर्वी या योजनेत एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच प्राणी दत्तक घेता येत असे. पण सामान्य नागरिकांनाही प्राणी दत्तक घेणे परवडावे यासाठी आता एका दिवसासाठीही ते दत्तक घेता येतात. एका दिवसासाठी प्राणी दत्तक घेण्यास पूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद असला, तरी या योजनेबद्दल जनजागृती कमी आहे. मोठय़ा उद्योग समूहांकडून अथवा कॉर्पोरेट क्षेत्राकडून योजनेस प्रतिसाद मिळणेही अपेक्षित आहे.’’
या प्राण्यांना कुणीच दत्तक घेतले नाही :
माकड, साळिंदर, भेकर, नीलगाय, घोरपड, सरडा
यांनाच अधिक मागणी :
बिबटय़ा, वाघ, साप, मोर, मगर, कासव
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2014 3:25 am