शाहीर अमर शेख चौकातील दुर्घटनेचा रेल्वे प्रशासनाला विसर

पुणे : मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात जाहिरात फलक कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना पावणेदोन वर्षांपूर्वी घडल्यानंतर आता त्याच जागी पुन्हा जाहिरात फलक उभारण्याचे काम सुरू झाले आहे. जाहिरात फलक मध्य रेल्वे प्रशासनाच्या जागेत उभा करण्यात आला होता. मात्र, या घटनेचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला असल्याचे दिसत असून पुन्हा त्याच जागी जाहिरात फलक उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक हा गजबजलेला चौक म्हणून ओळखला जातो. पावणेदोन वर्षांपूर्वी ५ ऑक्टोबर २०१८ रोजी गजबजलेल्या शाहीर अमर शेख चौकात दुपारी दीडच्या सुमारास सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा कोसळला होता. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता, तसेच अकरा जण जखमी झाले होते. रिक्षा, मोटारी, दुचाकी अशा वाहनांचे नुकसान झाले होते.

या घटनेनंतर शहरातील चौकाचौकातील इमारतींवर लावण्यात आलेल्या धोकादायक फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून करण्यात आला होता. त्या वेळी मध्य रेल्वेच्या जागेत उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकोचा लोखंडी सांगाडा मोडकळीस आला होता. मोडकळीस आलेला लोखंडी सांगाडा उतरविण्याचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली होती. या घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी पोलिसांकडून रेल्वेतील अभियंता, जाहिरात फलकाचा सांगाडा उतरविण्याचे काम करणारा ठेकेदार, मजूर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दुर्घटनेचा विसर रेल्वे प्रशासनाला पडल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या भागात जाहिरात फलकाचा सांगाडा पडला होता, तेथेच आता जाहिरात फलकाचा सांगाडा उभारण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. लोखंडी सांगाडा उभारण्याचे काम सुरु असताना या भागातून जाणारे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या मनात जाहिरात फलक दुर्घटनेच्या कटू स्मृती तरळतात.

महसुलाचा हव्यास; दुर्घटनेचा विसर

मध्यरेल्वेच्या जागेत मालधक्का चौक, प्रादेशिक परिवहन चौक, शाहीर अमर शेख चौकात जाहिरात फलक आहे. हे जाहिरात फलक महसूल मिळवण्याच्या उद्देशाने बांधण्यात आले असले तरी जाहिरात फलक दुर्घटनेचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. दुर्घटना घडल्यानंतर या घटनेची रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी  करण्यात आली होती. त्या वेळी जाहिरात फलकाचा सांगाडा उतरविणारा ठेकेदार या दुर्घटनेस जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले होते.