न्यायालयात सुरू असलेल्या दावा किंवा खटल्याच्या स्थितीची माहिती वकिलांना आता एसएमएसवर मिळू शकणार आहे. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील कोणता दिनांक दिला आहे, न्यायालयासमोर असलेल्या खटल्याची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, ही माहिती वकिलांना कार्यालयात बसल्याबसल्या समजणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेतही बचत होईल. सुरुवातीला ही सेवा वकिलांपुरती मर्यादित ठेवली जाणार असून त्यानंतर पक्षकारांना समाविष्ट केले जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दावे अथवा खटल्यांच्या सद्य:स्थितीची माहिती तेथील वकिलांना एसएमएसद्वारे दिली जाते. त्याच धर्तीवर पुण्यातील वकिलांसाठी ही योजना सुरू करण्यासाठी पुणे बार असोसिएशनने नुकताच एक ठराव संमत केला आहे. त्याबाबत मुख्य जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे आणि प्रशासनाबरोबर चर्चाही झाली. या सेवेबाबत मुख्य न्यायाधीशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बार असोसिएशनने संमत केलेला ठराव जिल्हा न्यायाधीशांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर हा ठराव उच्च न्यायालयाकडे देण्यात येईल, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे पाटील यांनी यांनी दिली.
एकाच वेळी अनेक वकिलांचे विविध न्यायालयात दावे किंवा खटले सुरू असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी स्वत: जाणे शक्य होत नाही. एक खटला सुरू असताना त्याच वेळी दुसऱ्या दाव्यात उपस्थित राहता आले नाही, तर त्या दाव्याची वा खटल्याची स्थिती अथवा पुढील दिनांक वकिलांना माहिती करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. नव्या सेवेमुळे आता वकिलांच्या वेळेत बचत होणार आहे. पुणे जिल्हा न्यायालयात सुमारे दहा हजारांवर वकील वकिली करतात. त्यांना सेवा देण्यात येणार असून त्यानंतर पक्षकारांना ही सुविधा देण्याचा विचार सुरू आहे, असे ढगे पाटील यांनी सांगितले.