मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यामध्ये झालेच पाहिजे, या मागणीसाठी शहरातील वकिलांनी मंगळवारी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. ‘वुई वॉन्ट जस्टिस’ अशी मागणी करीत रस्त्यावर आलेल्या वकिलांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना मागणीचे निवेदन दिले.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यामध्ये झाले पाहिजे, या मागणीसाठी पुणे बार असोसिशनतर्फे शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या इमारतीपासून शहरातील वकिलांनी मोर्चा काढला. असोसिशनचे अध्यक्ष राजेंद्र उमप, सतीश पैलवान, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. सुरेशचंद्र भोसले, हर्षद निंबाळकर, अहमद पठाण आणि महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल शिस्तपालन समितीचे सदस्य व पुणे बार असो.चे माजी अध्यक्ष बिपीन पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली ज्युनिअर अ‍ॅडव्होकेट, महिला आणि ज्येष्ठ वकिलांसह पाचशेहून अधिक लोक सहभागी झाले होते. आमदार गिरीश बापट, शरद रणपिसे, विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी वकिलांच्या मोर्चामध्ये सहभाग नोंदविला.
‘उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात झालेच पाहिजे’, ‘न्याय आपल्या दारी, खंडपीठ मुळा-मुठेच्या तीरी’, ‘पक्षकारांचा पैसा आणि वेळ वाचवा, खंडपीठ पुण्यात करा’ या घोषणांचे फलक वकिलांनी हाती घेतले होते. उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यामध्ये झाले पाहिजे या मागणीला आणि मोर्चाला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पुणे बार असोसिएशनने केला आहे.