बनावट लग्नपत्रिका, खर्चाचे खोटे तपशील सादर करून स्वत:च्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून घेणे. खोटय़ा वेतनचिठ्ठय़ा (पे स्लीप), बनावट हमीपत्र सादर करून बँकांमधून कर्ज काढणे. अशा खोटय़ा गोष्टींसाठी एकमेकांना जामीन राहणे. माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर ती देण्यास नकार देणे.
या गोष्टी कोणत्या खासगी उद्योगात किंवा सरकारी कार्यालयात घडल्या नाहीत, तर एका शाळेत घडल्या आहेत. शाळेतील शिक्षकांनीच हे उद्योग केले असून, त्यांना या गोष्टीसाठी मुख्याध्यापक आणि शाळेच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत केल्याचे उघड झाले आहे. याच शाळेतील कर्मचारी राजेश बेल्हेकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली असून, त्याबाबत पोलिसांत तक्रारही दिली आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडेही तक्रार देण्यात आली आहे. त्याची दखल घेऊन पुणे विभागातील उपसंचालक राजेंद्र गोधने यांनी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रमुखांना या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सहकारनगर येथील विद्या विकास विद्यालयातील शिक्षकांच्या विरोधात या तक्रारी देण्यात आल्या आहेत. बेल्हेकर हे याच शाळेत लेखनिक आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनंतर त्यांनी पोलिसांत या तक्रारी दिल्या आहेत. बेल्हेकर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, या शाळेच्या अनेक शिक्षकांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून विविध बँका आणि पतसंस्थांमधून लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. त्यासाठी शाळेच्या बनावट वेतनचिठ्ठय़ा, खोटी हमीपत्रे आणि स्वत:च्या मुला-मुलींच्या बनावट लग्नपत्रिका सादर केल्या आहेत. याद्वारे त्यांनी सात सहकारी बँकांकडून सहा लाखांहून अधिक रकमेची कर्जे काढल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. याशिवाय आणखी आठ-दहा बँकांमधून अशी लाखो रुपयांची कर्जे काढण्यात आली आहेत. हे प्रकार गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत.
शिक्षकांना ही खोटी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनीही मदत केली आहे. याचबरोबर शाळा आणि संस्थेकडूनही या प्रकारांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप बेल्हेकर यांनी पोलिसांत व शिक्षक संचालनालयाकडे दिलेल्या तक्रारींमध्ये केला आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागितली तेव्हा ती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप करण्यात आला आहे.

शाळेतील शिक्षकांकडून कोणकोणते गैरप्रकार?
– शाळेच्या बनावट वेतनचिठ्ठय़ा, बनावट हमीपत्रे, खर्चाची खोटी कोटेशन्स सादर करून बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे काढली.
– खोटय़ा लग्नपत्रिका, वास्तूशांतीच्या खोटय़ा पत्रिका, खर्चाचे खोटे हिशेब सादर करून भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढून घेतली.
– खोटय़ा व बनावट प्रकरणात शिक्षक एकमेकांना जामीन राहिले.
– माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती शाळेकडून देण्यात आली नाही.
– शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या गैरव्यवहारांवर वेळीच कारवाई केली नाही. उलट या गैरप्रकारांना हातभारच लावला.

‘‘राजेश बेल्हेकर हे कोणतीही पूर्वसूचना न देता गेले २२ महिने शाळेत हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे शाळेकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्या आकसापोटी ते शाळेला त्रास देत आहेत. शाळेने कोणत्याही प्रकारे खोटी कागदपत्रे तयार केलेली नाहीत. बेल्हेकर यांनी कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडातून काढलेल्या रकमांची माहिती मागितली होती. मात्र, ती कर्मचाऱ्यांची खासगी बाब असल्यामुळे अशा प्रकारची माहिती देता येऊ शकत नाही, याची कल्पना बेल्हेकर यांना देण्यात आली होती.’’
– अर्चना जांभोरकर, मुख्याध्यापिका, विद्या विकास प्रशाला