अफगाणिस्तानमधील ‘सलमा’ या धरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन झाल्याचे वृत्त अनेकांच्या वाचनात असेल, पण हे धरण चक्क पुण्यात ‘घडले’ आहे हे फारसे कुणाला ज्ञात नाही. पुण्यातील ‘केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र’ (सीडब्ल्यूपीआरएस) या शासकीय संस्थेत प्रतिकृतीच्या आधारे या धरणाच्या आराखडय़ावर काम करण्यात आले आहे.

या संस्थेला १४ जून रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. १९१६ मध्ये ‘स्पेशल इरिगेशन डिस्ट्रिक्ट’ या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. पाणी साठवणूक, जलविद्युत निर्मिती तसेच नदी व किनारपट्टीशी संबंधित अभियांत्रिकी प्रकल्पांसाठी संशोधन हे या संस्थेचे प्रमुख काम असून आतापर्यंत संस्थेने ५,९७३ प्रतिकृतींवर अभ्यास केला आहे, तर अशा २५ प्रतिकृती संस्थेत आहेत. वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेचे संचालक डॉ. मुकेश सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

अफगाणिस्तानातील ‘हरी रुद’ या नदीवर बांधलेल्या ‘सलमा’ धरणाला ‘हेरत डॅम’ वा ‘अफगाण-इंडिया फ्रेंडशिप डॅम’ असेही म्हणतात. मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी यांनी गेल्या शनिवारी या धरणाचे उद्घाटन केले. १९७८ च्या सुमारास हे धरण बांधण्यास सुरुवात झाली होती. परंतु एक-दोन वर्षांनी त्या प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काम बंद पडले आणि ते २००५ मध्ये पुन्हा सुरू झाले. पुण्यातील ‘सीडब्ल्यूपीआरएस’ने २००५ ते २००८ या कालावधीत या धरणाचा अभ्यास करून काही सूचना केल्या. त्यानंतर २०१५ मध्येही पुन्हा संस्थेकडून अभ्यास करण्यात आला.

संस्थेतील शास्त्रज्ञ वर्षां भोसेकर म्हणाल्या,‘‘धरणातील पाण्याचा प्रवाह सहज वाहावा यासाठी धरणाच्या वरच्या बाजूस ‘ट्रेनिंग वॉल’ बांधण्यात आल्या आहेत. प्रवाहावरील नियंत्रणासाठी सांडव्यावर भिंत बांधण्यात आली असून प्रवाह वळवण्यासाठी ‘एनर्जी डिसिपिटर डिफ्लेक्टर’ बांधण्यात आले. धरणाच्या पुढच्या भागाला पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नुकसान होऊ नये यासाठी ‘प्लंज पूल’ हे खड्डय़ासारखे बांधकामही करण्यात आले आहे. धरणाच्या बांधकामासंबंधीचा अभ्यास संस्थेत धरणाची प्रतिकृती बनवून करण्यात आला.’’

जलसंवर्धनातील ‘जुने ते सोने’!

पाण्याची साठवणूक व संवर्धनासाठी जुन्या काळी वापरात असलेल्या तंत्राबाबत ‘ट्रॅडिशनल वॉटर टेक्नोलॉजी पार्क’ सुरू करण्याचा संस्थेतर्फे प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. ‘देशात जलसंवर्धनासाठीच्या जवळपास तीनशे जुन्या काळच्या पद्धती अस्तित्वात असून प्रदेशांच्या भौगोलिक रचनेनुसार त्या बदलतात. उदा. गुजराथमधील बावडी ही एक चांगली पद्धत होती. अशा जुन्या जलसंवर्धन पद्धती आताच्या काळात कशा वापरता येतील याबाबत संशोधन केले जाईल,’ असे डॉ. मुकेश सिन्हा यांनी सांगितले. राज्यांना या संदर्भात विचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश अशा काहींवर काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात हिवरेबाजार येथे यशस्वी ठरलेल्या जलसंवर्धन पद्धतीचा विस्तार करण्यासाठी राज्यातही समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांना संस्था फिरून पाहण्याची संधी

धरणातून पाणी सोडताना ते कसे मोजले जाते, धरणाची लहान प्रतिकृती कशी काम करते, समुद्रातील बंदरात मालवाहतूक करणारी जहाजे थांबवण्याचा तळ उभारण्यासाठी भरती आणि ओहोटीचा विचार कसा केला जातो, यमुना नदीवर बांधलेल्या विविध पुलांच्या संदर्भात नदीच्या प्रवाहाचा अभ्यास कसा होतो अशा सहसा नागरिकांपर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टींची माहिती करून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. खडकवासला येथे असलेल्या ‘केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्रा’त १४ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळात ‘ओपन डे’चे आयोजन करण्यात आले असून या दिवशी नागरिक संस्थेस भेट देऊन विविध १५ प्रतिकृती पाहू शकतील. नागरिकांसह लहान मुलांसाठी या दिवशी प्रश्नमंजुषा आणि मजेचे खेळही घेतले जातील, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.