28 November 2020

News Flash

आफ्रिकेतील मालावी हापूस बाजारात

गेल्या वर्षी नव्वद टन मालावी हापूसची आयात करण्यात आली होती.

पुण्यातील बाजारात आवक; एका पेटीचा दर २२०० ते २६०० रुपये

पुणे : आफ्रिकेतील मालावी देशातून हापूस आंब्यांची आवक पुणे तसेच मुंबईतील बाजार समितीच्या आवारात सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात मालावी हापूसच्या एका पेटीचा दर फळाचे आकारमान आणि प्रतवारीनुसार बारा ते चौदा फळांसाठी २२०० ते २६०० रुपये असा आहे.

आफ्रिकेतील मालावी देशात एका युरोपियन कंपनीकडून हापूस आंब्यांची लागवड केली जाते. २००९ मध्ये कंपनीने कोकणातील दापोली येथून हापूस आंब्यांची चाळीस हजार कलमे मालावी येथे नेली. कोकणाप्रमाणेच मालावीतील वातावरण हापूस आंब्यांच्या लागवडीला पोषक आहे. तेथे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आंबे, केळी, अननसाची लागवड केली जात आहे. युरोपियन कंपनीने मालावीत आंबा लागवड केल्यानंतर सुरुवातीला हापूसची आवक तुरळक प्रमाणात होत होती. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मालावी हापूसची आवक वाढली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील आंबा व्यापारी लक्ष्मण परशराम खैरे अँड सन्सचे नाथसाहेब खैरे यांनी दिली.

गेली पाच वर्षे मालावी हापूसची आयात केली जात आहे. गेल्या वर्षी नव्वद टन मालावी हापूसची आयात करण्यात आली होती. पुणे, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, कोल्हापूर, सांगली येथील बाजारपेठेत मालावी हापूस विक्रीस पाठविला जातो. गेल्या आठवड्यात मालावी हापूसची आवक सुरू झाली. पहिल्या टप्प्यात पंधराशे पेटी मालावी हापूसची आवक झाली. तीन दिवसांपूर्वी मार्केटयार्डातील फळबाजारात अडीच हजार पेट्यांची आवक झाली. एका पेटीत साधारणपणे तीन किलो आंबे बसतात. फळांच्या आकारमानानुसार एका पेटीत १२ ते १४ आंबे बसतात. घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात मालावी हापूसच्या

पेटीला २२०० ते २४०० रुपये दर मिळाला होता. गेल्या दोन दिवसात मालावी हापूसच्या पेटीमागे २०० रुपयांनी घट झाली. किरकोळ बाजारात मालावी हापूसच्या पेटीची विक्री २२०० ते २४०० रुपये दराने केली जात आहे, असे खैरे यांनी सांगितले.

मालावी हापूसची आयात भारतात दरवर्षी केली जाते. पंधरा डिसेंबरपर्यंत मालावी हापूसची आवक सुरू राहील. पुणे, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, कोल्हापूर, सांगली येथील बाजारपेठेत मालावी हापूसची आवक सध्या विक्रीस उपलब्ध आहे. – नाथसाहेब खैरे, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:03 am

Web Title: africa malavi hapus magno in market akp 94
Next Stories
1 ‘पदवीधर’, ‘शिक्षक’चा निकाल पुणेकरांच्या हाती
2 अवकाळी पावसाचे सावट
3 आरोग्य क्षेत्रातील नवसंकल्पनांचा अंजनी माशेलकर पुरस्काराने सन्मान
Just Now!
X