एक डझनाचा भाव १८०० ते २ हजार रुपये

पुणे : आफ्रिका खंडातील मालावी देशातील हापूस आंबा मुंबईपाठोपाठ पुण्यातील घाऊक फळबाजारात दाखल झाला आहे. मालावी हापूसच्या एक डझनच्या खोक्याला १८०० ते २ हजार रुपये असा भाव मिळाला.

मालावी हापूसचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. डिसेंबर महिन्यापर्यंत मालावी हापूसचा हंगाम सुरू राहतो. एका उद्योजकाने २०१२ मध्ये दापोली येथून हापूस आंब्याची कलमे (मातृवृक्ष) आफ्रिका खंडातील मालावी देशात नेली. मालावीतील ७०० हेक्टर जमिनीवर कलमांची अतिघन पद्धतीने लागवड करण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये या आंब्याचे उत्पादन सुरू झाले. त्या वेळी तुरळक प्रमाणात मालावी हापूस भारतात विक्रीसाठी पाठविण्यात आला होता, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.

सलग दोन वर्ष मालावी हापूसची आवक भारतात सुरू आहे. हंगामातील निर्यात यंदा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झाली आहे. प्रक्रिया उद्योगासाठी या आंब्याची लागवड करण्यात आली आहे. काही प्रमाणात मालावी हापूस युरोप तसेच आखाती देशात विक्रीसाठी पाठविला जात आहे, असे मालावी हापूसचे आयातदार निरंजन शर्मा यांनी सांगितले. वाशी बाजार आवारातील व्यापारी संजय पानसरे आणि पुणे बाजार समितीच्या आवारातील व्यापारी नाथसाहेब खैरे यांच्याकडे मालवी हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. यंदा दहा हजार डझन मालावी हापूस विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, सीमा शुल्क विभागातील काही तांत्रिक अडचणींमुळे आंबा बाजारात उशिरा विक्रीसाठी दाखल झाला. त्यामुळे यंदा पाच हजार डझन आंब्यांची विक्री करणे शक्य होईल, असे सांगण्यात आले.

रत्नागिरी हापूससारखीच चव

मालावी हापूसचा आकार, रंग आणि चव कोकणातील हापूसप्रमाणेच आहे. त्यामुळे हा आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, या आंब्याचे दर थोडे जास्त आहेत. ऑक्टोबरमध्ये मालावी हापूस बाजारात विक्रीस दाखल झाल्यास भारतात या आंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असे फळबाजारातील व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.