सतरा वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. २००३ मध्ये पाच जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोडमध्ये सोनिगरा ज्वेलर्सवर धाडसी दरोडा टाकला होता. जीवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी २१ तोळे सोन्याचे दागिने आणि ८ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, रघुवीरसिंग चंदुसिंग टाक असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. २००३ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड परिसरात असणाऱ्या सोनिगरा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. हे दुकान धनराज केसरीमल यांच्या मालकीचे होते. तेव्हा, पाच जणांनी दरोडा टाकत धनराज यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत २१ तोळे सोन्याचे दागिने आणि ८ लाख ५० हजारांची रोख रक्कम लुटली होती. याप्रकरणी देहूरोड परिसरात अज्ञात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांपैकी, आरोपी रघुवीरसिंग हा गेल्या १७ वर्षांपासून फरार होता. तो वेष बदलून गुंगारा देत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. अखेर पोलीस अधिकारी राम गोमारे यांनी कर्मचारी फारूक मुल्ला, राजीव ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने, यांच्यासह जालना येथून या गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा आणि अटकेचा योगायोग

२९ जुलै २००३ ला हा धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर आज २९ जुलै रोजीच रघुवीरसिंगला तब्बल १७ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारावर राज्यात विविध शहरात एकूण २० गुन्हे दाखल आहेत.