लातूरमध्ये राहणारा १४ वर्षांचा मुलगा. आई लहानपणीच वारल्यामुळे मावशीकडे राहणारा. ३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी-सास्तूरचा महाभयंकर भूकंप झाला आणि मावशीचे घरही उद्ध्वस्त झाले. मावशी, मावशीचे यजमान, जवळचे कुणीच उरले नाही. एकटय़ा पडलेल्या या मुलाला कुणाचाच आधार उरला नाही. अशा वेळी भारतीय जैन संघटनेने त्याला आपलेसे केले. पुण्याला आणले, शिकवले. आज तोच निराधार मुलगा ‘लुपिन फार्मास्युटिकल्स’ या औषध कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ झाला आहे..
.. नेताजी इंगळे यांची ही कहाणी. त्या वेळी मदत मिळाली नसती तर इतके शिक्षण घेणे शक्यच झाले नसते, अशी भावना ते व्यक्त करतात.                                   किल्लारी भूकंपाला या सोमवारी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमधील मुलांना संस्थेने शिक्षणासाठी पुण्यात आणले होते. भूकंपानंतर मदतीच्या शोधात वणवण करणारी, भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह असलेली ही मुले आज शिकून खंबीरपणे उभी राहिली आहेत. त्यातील कुणी संशोधक आहे, कुणी अध्यापक झाले आहे तर कुणी समर्थपणे स्वत:चा व्यवसाय करत आहे.
प्रेमचंद गायकवाड यांची गोष्टही अशीच. भूकंप झाला त्या वेळी त्यांनी उमरग्याला नुकताच अकरावीत प्रवेश घेतला होता. भूकंप झाल्यानंतर त्यांचे कुटुंब तर वाचले, पण सारे जीवनच अस्ताव्यस्त झाले. ‘‘त्या वेळी भारतीय जैन संघटनेने भूकंपग्रस्त भागात अन्नदानाला सुरुवात केली होती. उद्ध्वस्त झालेल्या गावांमधील दृष्य अस्वस्थ करणारे होते. रस्त्यांवर शालेय मुले इकडेतिकडे भटकत होती. आपले भविष्य काय याचे उत्तर कुणाकडेच नव्हते! या मुलांची शालेय स्थिती काय, पुण्याला शिकायला येण्याची त्यांची तयारी आहे का, अशी माहिती संस्थेतर्फे गोळा केली गेली आणि २५ ऑक्टोबरला मी पुण्यात शिकायला आलो,’’ प्रेमचंद आपल्या आठवणी सांगतात. सध्या ते पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विषयाचे अध्यापक आहेत. स्वत:च्या पायावर ठामपणे उभे आहेत.
मंगळूरला राहणारा अमर बिराजदार याची आमखी वेगली कथा. तो भूकंपाच्या वेळी शिकण्यासाठी बाहेर होता. त्यामुळे वाचला. त्याचे आई-वडील जखमी झाले होते. जे काही जवळ होते-नव्हते ते सगळे भूकंपात गेले होते. संस्थेत दहा वर्षे शिकून गावी परतल्यानंतर तोच अमर दुग्धव्यावसायिक बनला आहे. इतकेच नव्हे तर त्याने गावात भूकंपग्रस्त कृती समिती स्थापन करून अशा तरुणांना शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नही केले आहेत.. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाची काल्पनिक कथा जागोजागी ऐकवली जाते. किल्लारीच्या भूकंपानंतर खऱ्या अर्थाने मातीच्या ढिगाऱ्यातून उभे राहिलेले हे तरुण आणि त्यांच्या कथा आपल्या आसपास आहेत.
किल्लारीच्या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद पट्टय़ातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली होती. या गावांमधील १२०० मुलांना भारतीय जैन संघटना या संस्थेने पुढील शिक्षण व निवासासाठी आधार दिला होता. ही मुले २९ सप्टेंबरला वाघोली येथे संस्थेत जमणार आहेत. या आपत्तीला वीस वर्षे पूर्ण झाल्याचा योग साधून ते माजी विद्यार्थी संघटनाही स्थापन करणार आहेत.