जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून पाषाण तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या ४ ते ५ वर्षांत तलावाच्या परिसरात लक्षणीय बदल घडले आहेत. तलाव परिसरात दिसणाऱ्या काही पक्ष्यांच्या प्रजातींवर मात्र या बदलांचा मोठा परिणाम दिसून आला आहे. सुशोभीकरणाच्या प्रयत्नांमध्ये तलावालगतच्या भुसभुशीत मातीच्या तसेच दलदलीच्या जागा जवळजवळ नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे केवळ अशाच जागांवर आढळणारे पक्षीही या परिसरात फिरकेनासे झाले आहेत. काही पक्षी अभ्यासकांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.
 ४-५ वर्षांपूर्वी या ठिकाणी तलावाच्या काठावर राहणारे चार प्रकारचे धोबी पक्षी (व्ॉकटेल) दिसायचे. यात ‘व्हाईट ब्रोड व्ॉकटेल’ हा स्थानिक रहिवासी पक्षी आणि ‘व्हाईट व्ॉकटेल’, ‘ग्रे व्ॉकटेल’ आणि ‘यलो व्ॉकटेल’ हे तीन स्थलांतरित पक्षी दिसत असत. व्हाईट व्ॉकटेल आताही दृष्टीस पडत असला तरी ग्रे आणि यलो व्ॉकटेल पक्ष्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत परिसरात लक्षणीयरीत्या कमी झाालेली दिसते आहे.
पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील म्हणाले, ‘‘तलावाच्या सुशोभीकरणाच्या प्रयत्नांमध्ये मूळची ओलाव्याची भुसभुशीत जमीन राहिलेली नाही. त्यामुळे व्ॉकटेलच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे. ‘ट्री पिपिट’ हे नेहमी न दिसणारे स्थलांतरित पक्षी या परिसरात दिसत. तेदेखील आता कमी दिसतात. ‘सँड पाईपर’ या स्थलांतरित पक्ष्यांच्या ‘कॉमन सँड पाईपर’ आणि ‘वुड सँड पाईपर’ या दोन्ही प्रजाती या परिसरात दिसतात. तसेच ‘पेंटेड स्नाईप’ हा दलदलीत राहणारा पक्षीही दिसतो. हे पक्षी पाणी आणि टणक जमीन यांच्या मधला चिखल आणि दलदलसदृश पट्टय़ात राहतात. तलावाजवळ दलदलीची जागा न उरल्यामुळे या पक्ष्यांपैकीही सध्या एखाद-दुसराच पक्षी आढळतो.’’
फीजंट टेल्ड जकाना, ब्राँझ विंग जकाना, कूट (वारकरी पक्षी), पर्पल मूरेन (जांभळी पाणकोंबडी) हे पक्षीही या परिसंस्थेत आढळत असल्यामुळे त्यांच्यासाठी तलावाचा किनारा उघडा न राहू देता तिथे पाणकणीस या वनस्पतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे मत पक्षी अभ्यासक डॉ. सत्यशील नाईक यांनी व्यक्त केले.  

कोणते पक्षी फिरकेनासे झाले?
– धोबी (व्ॉकटेल) पक्ष्यांच्या चार प्रजाती (विशेषत: ग्रे व यलो व्ॉकटेल)
– ट्री पिपिट   
– ‘सँड पाईपर’च्या दोन प्रजाती
– पेंटेज स्नाईप

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

हौशी छायाचित्रकारांची वर्दळ वाढली

– तलावाजवळ वाहने उभी करणे सुरू

सध्या तलाव परिसरात पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांची वर्दळ वाढली आहे. मात्र यातील कित्येकजण छायाचित्रे काढण्याच्या उत्साहात आपण नकळत तलावाच्या परिसंस्थेत ढवळाढवळ करतो आहेत, हे विसरतात. परिसरात फिरायला व छायाचित्रे काढायला येणारे काही नागरिक आपली वाहने तलावाच्या खूप जवळ नेऊन उभी करत असल्याचे निरीक्षण काही पक्षी अभ्यासकांनी नोंदवले. अशा प्रकारे होणाऱ्या थेट मानवी हस्तक्षेपाचा या परिसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.