पिंपरी : शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे गुरुवारी (१ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे मताधिक्य न मिळालेल्या भोसरीत फिरकले नाहीत, अशी तक्रार मध्यंतरी झाली होती. या पाश्र्वभूमीवर, पक्षाच्या नगरसेवकांची बैठक, कार्यकर्त्यांशी संवाद आणि महापालिका आयुक्तांमवेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा असा भरगच्च कार्यक्रम आखून कोल्हे शहर दौऱ्यावर येत आहेत.

पालिका मुख्यालयात गुरुवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर खासदार कोल्हे यांची बैठक होणार आहे. बेकायदा बांधकामे, शास्तिकर, रेडझोन, कचरा समस्या, पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याचा प्रकार, नाशिक फाटा ते मोशी दरम्यानचे सहापदरी रस्तारूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय यासह इतर स्थानिक मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.  सायंकाळी ते राष्ट्रवादीच्या खराळवाडी येथील कार्यालयात पदाधिकारी आणि नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.

डॉ. कोल्हे शिरूरमध्ये विजयी झाले. मात्र, त्यांना भोसरीत मताधिक्य मिळाले नाही. खासदार झाल्यानंतर त्यांच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे ते भोसरीत येऊ शकले नाहीत. त्यावरून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी डॉ. कोल्हे भोसरीत फिरकत नसल्याच्या तक्रारी अजित पवार यांच्याकडे केल्या. मात्र, पवारांनी कोल्हे यांची जोरदार पाठराखण करत ते केवळ शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूतोवाच केले. या पाश्र्वभूमीवर खासदार कोल्हे गुरुवारी शहरात येत आहेत.