पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट येथे काल(दि.२६) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास पाचशेहून अधिक दुकाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री एकच्या सुमारास शर्थीचे प्रयत्न करुन या भीषण आग आटोक्यात आणली. पण, ही आग आटोक्यात आणून कॅन्टोन्मेंट अग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश हसबे हे घरी जात असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.

आग आटोक्यात आणल्यानंतर सकाळी साडेपाच-सहा वाजण्याच्या सुमारास हसबे हे घरी जायला निघाले. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रकाश हसबे यांच्यासोबत काम करणाऱ्या काही व्यक्तींशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “काल आम्हाला रात्री साडे दहाच्या सुमारास फॅशन स्ट्रीट येथे आग लागली अशी माहिती मिळाली. त्यानंतर आमच्या विभागातील सर्व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आमच्यासोबत प्रकाश हसबे देखील होते. ते आग विझेपर्यंत आमच्यासोबत होते. त्यानंतर काही वेळाने आमच्याशी गप्पाही मारल्या आणि म्हटले घरी जाऊन फ्रेश होऊन येतो. सकाळी आपण भेटू असे सांगून ते घरी जाण्याकडे निघाले. मात्र त्यांच्या दुचाकीला येरवडा येथे पाठीमागून एका वाहनाने जोरात धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे आम्हाला माहिती मिळाली”. यामुळे एक कर्तव्यदक्ष व्यक्ती आम्ही गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.