शहरात स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स-एलबीटी) लागू झाल्यापासून आतापर्यंत एक रुपयाही एलबीटीचा भरणा न केलेल्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली असून या कारवाई अंतर्गत दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीमुळे अवघ्या दोनच दिवसांत तीन कोटी २६ लाख रुपये एवढा एलबीटीचा भरणा झाला.
महापालिकेचे सहआयुक्त, स्थानिक संस्था कर आकारणी प्रमुख विलास कानडे यांनी शनिवारी ही माहिती दिली. ज्या व्यापाऱ्यांनी वा व्यावसायिकांनी आतापर्यंत एलबीटीचा भरणाच केलेला नाही, अशांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी तसेच जप्तीची कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने अनुमती दिल्यानंतर महापालिकेने दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमुळे दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणावर एलबीटी गोळा झाला आहे. ज्या व्यापाऱ्यांनी आतापर्यंत एलबीटीसाठी नोंदणी केलेली नव्हती, अशांची नोंदणीही दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणात झाली. तसेच अनेकांनी दूरध्वनी करून, समक्ष भेट घेऊन एलबीटी संबंधीची पूर्तता करत असल्याचे सांगितले, अशी माहिती कानडे यांनी दिली.
तपासणी सुरू झाल्यानंतर दोन दिवसांत १२२५ व्यापाऱ्यांनी चलने नेली असून त्यातील ७४५ व्यापाऱ्यांनी तीन कोटी २६ लाख ११,३६४ रुपये एवढा एलबीटी जमा केला आहे. तसेच दोन दिवसांत ८२ व्यावसायिकांनी नव्याने नोंदणी केली आहे. कानडे यांच्या नियंत्रणाखाली अरुण ठाणेकर, श्याम तारू, रूपचंद कांबळे, कुसाळकर, काळोखे, जांभळे, मिलखे, आडेप, अडागळे, जगदाळे, कोथमिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
येरवडा येथील मॉलवर करण्यात आलेल्या कारवाईत संबंधितांनी अंतरिम दंडाची रक्कम म्हणून चार लाख रुपये भरले असून गुलटेकडी येथेही एका मॉलवर करण्यात आलेल्या कारवाईत एलबीटी न भरलेला माल मोठय़ा प्रमाणावर आढळला. बाणेर येथील कारवाईतही संबंधित व्यावसायिकाने अंतरिम दंडापोटी एक लाख रुपये भरले आहेत. या सर्व व्यावसायिकांकडील कागदपत्र अंतिम तपासणीसाठी जमा करण्यात आली आहेत.