पिंपरी-चिंचवड परिसरातून एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवळल्या आहेत. मागील आठवड्यात मोटारीच्या सहाय्याने एटीएमला दोर बांधून त्यांनी एटीएम फोडले होते. त्यात ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होती. मात्र, १०० सीसीटीव्हीच्या तपासणीद्वारे आणि १५० पेक्षा अधिक गुन्हेगारांची चौकशी करत आरोपीना जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

या घटने प्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी वय- २० वर्ष रा.हडपसर आणि शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे वय- २३ रा.गाडीतळ हडपसर यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकुण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, १ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, एटीएम हे मुळा-मुठा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले होते. तर सराईत गुन्हेगार अजसिंग यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हा दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनच्या काळात एटीएम फोडीची घटना घडली होती. त्यामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पाच जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचं समोर आले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली, विविध सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, निगडी ते मांजरी या परिसरातील तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही चेक करण्यात आले. तेव्हा, संबंधित आरोपी हे हडपसर च्या दिशेने गेल्याच निष्पन्न झाले.

ज्या महिंद्रा पिकअप मधून एटीएमची चोरी करण्यात आली ते वाहन देखील चोरीचे असल्याचं तपासात समोर आले. तसेच जामिनावर बाहेर आलेल्या दीडशे आरोपींची चौकशी करत आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर संबंधित आरोपी हे हडपसर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. नवीन खबऱ्या मार्फत आरोपींचे निश्चित ठिकाण समजले आणि तीन दिवस ट्रॅप लागून त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून अद्याप दोन गुन्हेगार फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सतीश कांबळे यांच्या पथकाने केली आहे.