युवती आणि महिलांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या तुळशीबाग परिसराने तब्बल अडीच महिन्यांनी शुक्रवारी गजबज अनुभवली. नियम आणि अटींचे पालन करून दुकाने उघडण्यात आल्यानंतर महिलांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

युवती आणि महिलांचे आवडते खरेदीचे ठिकाण अशी तुळशीबाग परिसराची प्रसिद्धी आहे. तांब्या-पितळ्याच्या गृहोपयोगी वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी, रेडिमेड गारमेंट, बॅग, पर्स, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आणि कटलरी अशी तुळशीबागेत तीनशेहून अधिक दुकाने आहेत. तर, पथारी व्यावसायिकांची संख्या पावणेचारशेच्या घरात आहे. केवळ पुणेकरांचीच नाही,तर देशाच्या विविध भागांतून आलेल्या महिलांची तसेच परदेशातून आलेल्या पर्यटकांची तुळशीबागेमध्ये खरेदी केल्याशिवाय पुणे भेट पूर्ण होत नाही. सदैव महिला वर्गाची लगबग असलेल्या तुळशीबाग परिसराने टाळेबंदीमुळे अडीच महिन्यांची सक्तीची विश्रांती घेतली होती.

महापालिकेने सम आणि विषम तारखांनुसार दुकाने आणि पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूची सव्वाशे दुकाने आणि शंभर पथारी व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महिलांनी खरेदी करण्यासाठी उत्सुकतेने हजेरी लावली होती.

खरेदी करण्यासाठी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. वस्तू हाताळायला देताना काळजी घेतली जात असून दुकानासमोर गर्दी होऊ दिली जात नाही, असे व्यापारी मोहन साखरिया यांनी सांगितले.

ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य

तुळशीबागेत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. दुकानातील कर्मचारी मुखपट्टी आणि हातमोजे यांचा वापर करत आहेत. ग्राहकांनी वस्तूला हात लावण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर दिले जात आहे, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित यांनी दिली. नियमानुसार दोन पथारी व्यावसायिकांमध्ये १५ फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. दुकानदारांना आठवडय़ातून तीन दिवस, तर पथारी व्यावसायिकांना दोन दिवस व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे, असे पंडित यांनी सांगितले.