विदर्भाच्या काही भागांत सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती असताना मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानाचा पाराही वाढला आहे. कोकण विभागाला उन्हाच्या चटक्यापासून काही प्रमाणात दिलासा असला, तरी उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान चाळिशीत आणि काही ठिकाणी त्याही पुढे गेले आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा काही प्रमाणात खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. काही भागात संध्याकाळनंतर अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत असल्याने रात्रीचे किमान तापमान वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते २ ते ४ अंशांनी कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. परिणामी ब्रह्मपुरी येथील कमाल तापमानाचा पारा सोमवारी ४३.५ अंशांवर पोहोचला होता. इतर सर्व ठिकाणी कमाल तापमान ४० ते ४२ अंशांवर आहे. या भागात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.
मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव आदी भागांत तापमानाचा पारा ४० अंशांपुढे असून, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागांत तो ४० अंशांजवळ पोहोचला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचा पाराही ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. कोकण विभागात मात्र बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 12:26 am