बारामती मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मुर्टी-मासाळवाडी येथे सभा घेऊन आम्हाला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आप’चे उमेदवार सुरेश खोपडे यांनी पोलिसांकडे तक्रार करत त्यांच्या भाषणाचा ऑडिओच सादर केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
खोपडे यांनी दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे, की १६ एप्रिल रोजी अजित पवार यांनी मुर्टी मासाळवाडी गावामध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सार्वजनिक सभा घेतली. या गावातील नागरिकांना सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास पाणी बंद करण्याची धमकी दिली. ‘‘उद्या कोणी गडबड केली तर सुप्रियाला मी बाहेरच्या मतदार संघातून निवडून आणणार आहे. पण, जर कुठल्या गावाने गडबड केली तर तिथलं पाणी सगंळ बंद करीन मी’’ असे नागरिकांना धमकावले असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. खोपडे यांनी या संभाषणाची पूर्ण ऑडिओ टेप अर्जासोबत पोलिसांकडे सादर केली आहे. त्यात गावकऱ्यांनी विचारलेल्या पाणीप्रश्नाच्या संदर्भात अजित पवार यांनी त्याला दिलेले उत्तर त्या ऑडिओमध्ये आहेत. मतदान न केल्यास गावाचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशी धमकी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे या गावाबरोबर मतदार संघातील इतर लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद करणे हा दखलपात्र गुन्हा असून निवडणूक कायद्याचे उल्लंघन करणार आहे. त्यामुळे पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे. ‘आपण असे म्हटलो नव्हतो, कोणीतरी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला आहे,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले, की मुख्य निवडणूक अधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले आहे. तक्रारीसोबत असलेली ऑडिओ क्लिप खरी आहे का, त्यातील आवाज अजित पवार यांचाच आहे का याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले, की खोपडे यांनी केलेल्या तक्रारीची पोलीस उपअधीक्षक संभाजी कदम हे चौकशी करीत आहेत. चौकशीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.