पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधात आज पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. तर या निर्णया विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मुख्यमंत्री साहेब मागील वेळेस जशी हेल्मेट सक्ती रोखली तशी यंदा पण रोखा, कुठ तरी पाणी मुरतय या आशयाचा मजकूर असलेला फलक सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.

पुणे शहरात 1 जानेवारी 2019 पासून दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणार्‍या चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. त्या निर्णयावर शहरातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला. त्यानुसार आज पतित पावन संघटने कडून बालगंधर्व रंगमंदिर समोरील चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर म्हणाले की, पुणे शहरात दोन वर्षापूर्वी देखील हेल्मेट सक्ती चा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या विरोधा नंतर प्रशासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता पुन्हा हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही निषेधार्थ बाब आहे. शहरात हेल्मेट सक्ती करता कामा नये. जर प्रशासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.