सिंहगड इन्स्टिटय़ूटने संस्थेतील ड्रेनेजचे आणि व अन्य दूषित पाणी कुसगाव गावातील ओढय़ात सोडल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संस्थेने ड्रेनेजचे पाणी ओढय़ात सोडण्याचा प्रकार तातडीने बंद करावा तसेच डोंगरावर सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन व सरकारी जागेत भराव टाकण्याचे काम थांबवावे, या मागणीसाठी कुसगाव ग्रामस्थ शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) संस्थेच्या विरोधात आंदोलन करून मोर्चा काढणार आहेत.
सिंहगड संस्थेतील विद्यार्थी व शिक्षक यांची मिळून संस्थेत राहणाऱ्यांची संख्या आठ हजार असून संस्थेने सर्व सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी उघडय़ावर ओढय़ात सोडले आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही संस्था हा प्रकार थांबवत नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुरज केदारी, ज्ञानेश्वर गुंड आणि गबळू ठोंबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. हा प्रकार थांबत नसल्यामुळे शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही केदारी यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याबाबतदेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंहगड संस्थेला झुकते मात देत आहे. कुसगाव-डोंगरगाव पाणीपुरवठा योजनेमधून कुसगाव, डोंगरगाव या दोन ग्रामपंचायती व सिंहगड संस्थेला पाणीपुरवठा केला जात होता. सिंहगड संस्थेमधील निवासींची संख्या आठ हजार असताना त्यांना दैनंदिन १८ ते २० लाख लिटर पाणी दिले जाते. कुसगाव डोंगरगावची लोकसंख्या २३ हजार असताना गावांना केवळ ११ लाख ७५ हजार लिटर पाणी दिले जाते. यामुळे गावात पाण्याची टंचाई व सिंहगड संस्थेमध्ये पाण्याची उधळपट्टी असे चित्र आहे. या प्रकाराबाबत तातडीने कारवाई व्हावी आणि नियमाप्रमाणे पाणी वाटप व्हावे, अशी मागणी असल्याचे केदारी आणि गुंड यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय गोल्फकोर्स मदानाच्या नावाखाली सिंहगड संस्थेने खासगी वन जागेवर मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करून उत्खननही केले आहे. त्यामुळे कुसगावाला भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गैरप्रकारांबाबत संस्थेवर कारवाई करावी, तसेच सह्याद्रीच्या पर्वत रांगेचे विद्रुपीकरण संस्थेने थांबवण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचीही माहिती केदारी यांनी दिली.