विजेचा खेळखंडोबा, नियोजनाचा अभाव, मनमानी व गलथान कारभार, नागरिकांना उद्धट उत्तरे अशा तक्रारी वाढल्यानंतर शहर भाजप कार्यकर्त्यांनी निगडीतील महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला. या कारभारात सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
भाजपचे सरचिटणीस अनूप मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोडके व जाधव या अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडले. महावितरणच्या मनमानी कारभाराबद्दल मोरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर, सुधारणा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या वेळी पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारनियमाची माहिती आधी द्यावी, वारा आला, पाऊस आला की विजेचा खेळखंडोबा सुरू होतो, त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, हंगामी कामगारांना प्रशिक्षण देऊनच कामे द्यावीत, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तक्रार केल्यानंतर त्याचे निवारण कधी होणार, याची माहिती तक्रारदाराला द्यायला हवी, आदी मागण्यांचा समावेश आहे. महावितरणविषयी नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत, त्याची दखल घेऊन आंदोलन केल्याचे मोरे यांनी पत्रकारांना सांगितले.