गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही कोंढवा येथील स्मशानभूमीचा प्रश्न महापालिका प्रशासन सोडवत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापालिका सभेत आंदोलन केले. भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ अंत्ययात्रा काढली आणि ती थेट मुख्य सभेतच आणली.
सभा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे भाजपचे नगरसेवक सभागृहात पोहोचले आणि त्यांनी प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा सुरू केल्या. सभा सुरू झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक योगेश टिळेकर, तसेच मनसेचे गटनेता वसंत मोरे, भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांची या विषयावर भाषणे झाली. कोंढव्यातील या प्रश्नाबाबत आम्ही गेली अठरा वर्षे पत्रव्यवहार आणि आंदोलने करत आहोत, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. कात्रज-कोंढवा रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीसाठीची जागा अतिशय कमी असल्यामुळे तेथे सातत्याने वाहतूक कोंडीही होते, असे टिळेकर म्हणाले.
या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी आवश्यक ती जागा पाहणी स्थानिक नगरसेवकांबरोबर करून आम्ही तसा प्रस्ताव तयार करू, असे निवेदन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी या विषयावरील चर्चेत केले.