पिंपरीतील एचए कंपनीतील प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी गुरुवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातील पेनिसिलीन निर्मितीचा कारखाना म्हणून ओळखली जाणारी हिंदूुस्तान अॅन्टीबायोटिक्स (एच.ए) ही कंपनी प्रचंड आर्थिक डबघाईला आली आहे. अर्ज, निवेदने, मोर्चे, आंदोलने करून कामगार थकले. मात्र निर्णय होत नसल्याने त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आमदार-खासदार व मंत्र्यांच्या नुसत्याच आश्वासनांना ते वैतागले आहेत. कंपनीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न होत असताना प्रत्यक्षात हाती काही लागत नसल्याने कामगार वर्गात तीव्र संताप आहे. या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी कामगारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. कामगारांचे गेल्या १८ महिन्यांपासून वेतन थकलेले आहे, ते तातडीने मिळावे, कंपनीचा पुनर्वसन प्रस्ताव बऱ्याच कालावधीपासून पडून आहे, त्याचा विचार करावा, अशी कामगारांची जुनी मागणी आहे. याशिवाय, अन्य प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी हे आंदोलन केले. बारणे, चाबुकस्वार, वाघेरे, नगरसेवक मंगला कदम, अरुण टाक, अरुण बोऱ्हाडे, कैलास कदम, संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर, महंमद पानसरे, मानव कांबळे, सखाराम नखाते, फजल शेख, विजय लोखंडे आदींसह मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते. एचए कामगार संघटनेचे अध्यक्ष व खासदार बारणे या वेळी बोलताना म्हणाले, येथील परिस्थिती सुधारावी, यासाठी दीड वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नाही. सरकार वेतन देत नाही आणि पॅकेजही देत नाही. ‘अच्छे दिन’ येतील, असे वाटले होते. मात्र, तसे काही झाले नाही. कामगारांमध्ये नाराजी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले, यातून तरी केंद्र सरकार जागे होईल का, या विषयी शंका असल्याचे बारणे यांनी नमूद केले.