शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन केले. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना रविवारी बाहेरील काही टोळक्यांनी मारहाण केली होती. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या प्रश्नावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन केले. सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या दिला. महाविद्यालयात सुरक्षारक्षक नाहीत, सीसीटीव्ही नाहीत. महाविद्यालयाच्या आवारात बाहेरील व्यक्तींचा सर्रास वावर असतो. बाहेरील मुले महाविद्यालयाच्या आवारात क्रिकेट खेळत असतात, त्यांच्याकडून मुलींवरही शेरेबाजी केली जाते. महाविद्यालयाला तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एकाही प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नाही. महाविद्यालयाच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापनाकडून काहीच उपाय केले जात नाहीत, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या सर्व उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कराळे यांनी दिल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. ‘विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारातील मिटकॉन कार्यालयाचे गेट बंद करण्यात येईल. सुरक्षेसाठी इतर सर्व आवश्यक उपायही करण्यात येतील,’ असे आश्वासन डॉ. कराळे यांनी विद्यार्थ्यांना दिले.