दिवसभर मोठय़ा प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि विद्यार्थ्यांची घोषणाबाजी अशा वातावरणात ‘एफटीआयआय’ सोसायटीच्या नियामक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच वादग्रस्त ठरलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांनी या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून ‘सीआयडी’ मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक बी. पी. सिंग यांची निवड करण्यात आली असून तेच संस्थेच्या शैक्षणिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
चौहान यांनी त्यांच्या पहिल्याच भेटीत संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. प्रसारमाध्यमांशी मात्र त्यांनी वा कोणत्याही सदस्याने न बोलणेच पसंत केले. चौहान व सिंग यांच्यासह प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, अभिनेते सतीश शहा, राहुल सोलापूरकर, चित्रपट विभागाचे सहसंचालक संजय मूर्ती आणि अतिरिक्त सचिव व आर्थिक सल्लागार डॉ. सुभाष शर्मा यांनी नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला, तर अनघा घैसास,  प्रांजल सैकिया, नरेंद्र पाठक, समीक्षक भावना सोमय्या, ऊर्मिल थापलियाल बैठकीस उपस्थित होते.
नियामक मंडळाने बैठकीत एफटीआयआयच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांच्या वार्षिक अहवालास तसेच लेखा विवरण पत्राला मंजुरी दिली. तसेच २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१६-१७ च्या आर्थिक अंदाजपत्रकालाही मान्यता देण्यात आली.
अधिकारी सदस्यांपैकी चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विशेष अधिकारी चैतन्य प्रसाद, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार, सत्यजित रे फिल्म इन्स्टिटय़ूटचे संचालक संजय पटनायक यांची बैठकीस उपस्थिती होती.

बंदोबस्त आणि कल्पक घोषणाबाजी!
संस्थेत दिवसभर ६० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. सकाळी चौहान यांचे आगमन होतानाच आंदोलक विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. या वेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये ढकलाढकली आणि धक्काबुक्की झाली. या वेळी २३ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतरही चौहान यांची बैठक सुरू असलेल्या इमारतीच्या आसपास विद्यार्थी किंवा प्रसारमाध्यमांना फिरकू दिले गेले नाही व आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग वारंवार आले आणि ‘ये अंदरकी बात हैं, पुलिस हमारे साथ हैं,’ अशा कल्पक घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. संध्याकाळी बैठक संपवून सोसायटीच्या प्रत्येक सदस्याची मोटार संस्थेबाहेर पडताना तर विद्यार्थ्यांच्या घोषणांना ऊत आला. ‘जब तक गज्जू भैय्या को हटा ना दे सरकार, जारी हैं हडताल,’ अशी गाणीही विद्यार्थ्यांनी म्हटली.

नियामक मंडळावर नामांकन झालेले सदस्य –
बी. पी. सिंग, राजकुमार हिरानी, सतीश शहा, प्रांजल सैकिया, नरेंद्र पाठक, भावना सोमय्या