छत्रपती शिवाजीमहाराज यांची आग्रा मोहीम ही जगातील अभूतपूर्व अशी घटना आहे, ज्यातून अखंड भारताला स्फूर्ती मिळाली, असे प्रतिपादन दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी चिंचवड येथे केले.
रामकृष्ण मोरे नाटय़गृहात गड किल्ले सेवा समिती आयोजित दुर्गप्रेमी पुरस्कार गौरव सोहळय़ात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दुर्गप्रेमी श्रीहरि तापकीर, सुरेंद्र शेळके, ब. हि. चिंचवडे, श्रमिक गोजमगुंडे, पुणे व्हेंचर्स, सचिन टेकवडे, प्रद्योत पेंढरकर, हेरंब पायगुडे, शुभम भूतकर, डॉ. श्याम अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ब्रिगेडियर सुरेश पाटील, शिक्षण मंडळ सदस्य नाना शिवले, राजेंद्र गावडे, शिवाजी निंबाळकर, गजानन चिंचवडे, संतोष निंबाळकर आदी उपस्थित होते. या वेळी आग्रा मोहिमेची पाश्र्वभूमी, मिर्झा राजा जयसिंग यांची भूमिका, तत्कालीन राजकारण आदींविषयीची सविस्तर माहिती चित्रफितीद्वारे दाखवण्यात आली. बलकवडे म्हणाले, भारताच्या केंद्रीय अभ्यासक्रमात मराठय़ांचा इतिहास केवळ दोन पानांत व छत्रपती शिवरायांचा इतिहास त्रोटक शब्दांत मांडला आहे. मराठय़ांचा पराक्रमी इतिहास विसरता येणार नाही. जगताप म्हणाले, स्वराज्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या आणि इतिहासावर प्रेम करायला लावणाऱ्या सर्व दुर्गप्रेमींमुळेच आपला इतिहास जिवंत आहे. राजेंद्र गावडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. नीलेश गावडे यांनी आभार मानले.