फळबागांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय

पुणे : राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे राज्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागांचा समावेश असून नुकसान झालेल्या सर्व फळबागांच्या उभारणीसाठी पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिली.

पुणे विभागातील रोहयो आणि फलोत्पादनाचा आढावा कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. कृषी आयुक्त सुहास दिवसे या वेळी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, की राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागांचा समावेश असून, त्यांची पुन्हा उभारणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. फळबागांमध्ये द्राक्ष पिकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी ठिबक सिंचनावरील शेतीला ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. नक्षलग्रस्त, कायम दुष्काळी आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांचा त्यात समावेश आहे.

अतिवृष्टी, पुरामुळे राज्यातील बाधित क्षेत्र

अतिवृष्टी, पुरामुळे राज्यातील १३ जिल्ह्य़ांमधील ७६ तालुक्यांमधील दोन लाख १४ हजार ९६.१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये भात, आंबा, भाजीपाला, चिकू, केळी, वरई, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, हळद, भुईमूग अशा विविध पिकांचे नुकसान झाले आहे. कोकण विभागातील रायगड जिल्ह्य़ातील दोन तालुके, ठाण्यातील तीन, सिंधुदुर्ग आठ, पालघर सात तालुके या नुकसानीत आहेत. नाशिक विभागात धुळे जिल्ह्य़ातील तीन, नाशिकमधील अकरा तालुके आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सातारा नऊ, सांगली चार, कोल्हापूर बारा, पुणे विभागात पुणे जिल्ह्य़ातील आठ, सोलापूर सहा, नगर एक, नागपूर विभागात वर्धा जिल्ह्य़ात तीन तालुक्यांमधील पिके बाधित झाली आहेत.