‘एआयसीटीई’ अध्यक्षांचे स्पष्टीकरण
वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवरील सामाईक प्रवेश परीक्षा लागू झाल्यानंतर अभियांत्रिकीसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) लागू करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी बुधवारी दिले.
राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश सध्या राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून करण्यात येतात. वैद्यकीय प्रवेशासाठी पुढील वर्षांपासून ‘नीट’ लागू करण्याच्या निर्णयामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीही देशपातळीवरील परीक्षा लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही खासगी शिकवणी चालकांनीही अशा प्रकारची जाहिरातबाजी करून आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली. मात्र अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव अद्याप विचाराधीन नसल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘अभियांत्रिकीचे प्रवेश हे जेईईच्या माध्यमातून करण्याचा कोणताही प्रस्ताव परिषदेच्या विचाराधीन नाही. जेईई लागू करण्याचा निर्णय भविष्यात घेण्याचा विचार झालाच तरीही तो निर्णय लगेच लागू करता येणे शक्य नाही. त्यासाठी निर्णय झाल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी द्यावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये. जेईई लागू करण्याच्या निर्णयाबाबत पसरलेल्या वृत्तात तथ्य नाही.’
‘सध्या अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. त्यासाठीच त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. गेले दोन दिवस सुनावणी झालेल्या महाविद्यालयांना त्यांच्याबाबत घेण्यात आलेले निर्णय लवकरच कळवण्यात येतील,’ असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.