21 September 2020

News Flash

एड्सग्रस्तांचे विवाहच नव्हे, तर पुनर्विवाहांचेही प्रमाण वाढले!

एड्सग्रस्तांच्या विवाहाचेच नव्हे तर त्यांच्या पुनर्विवाहाचेही प्रमाण वाढले आहे. हा बदल गेल्या तीन-चार वर्षांमध्ये दिसून आला आहे.

| February 8, 2014 03:20 am

एड्सग्रस्तांच्या विवाहाची आपल्या समाजात संकल्पना कितपत रुजेल, अशी शंका अगदी अलीकडच्या काळापर्यंत वाटत होती. पण आता परिस्थिती इतकी बदलली आहे की, एड्सग्रस्तांच्या विवाहाचेच नव्हे तर त्यांच्या पुनर्विवाहाचेही प्रमाण वाढले आहे. हा बदल गेल्या तीन-चार वर्षांमध्ये दिसून आला आहे.
नेटवर्क ऑफ पिपल लिव्हिंग विथ एचआयव्ही, मानव्य, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व धायरी आणि अक्षता विवाह संस्था यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी एड्सग्रस्त असलेल्या, पण लग्न करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी वधू-वर मेळावा आयोजित केला होता. हा अशा प्रकारचा पहिलाच मेळावा होता. त्यानंतर गेल्या शनिवारी पुण्यात असा पाचवा वधू-वर मेळावा पार पडला. या काळात एड्सग्रस्तांच्या विवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर पुनर्विवाहांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे.
याबाबत अक्षता विवाह संस्थेचे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले, ‘‘२०१०, ११ व १२ या वर्षांमध्ये या मेळाव्यात एकूण २५ विवाह जुळले होते. या तुलनेत गेल्या वर्षी (२०१३) पुनर्विवाहांची संख्या ३८ इतकी जास्त होती. विशेष बाब म्हणजे, गेल्या चार मेळाव्यांमध्ये येणाऱ्या एड्सग्रस्तांपैकी प्रथम विवाहासाठी येणाऱ्यांची संख्या अगदीच कमी म्हणजे केवळ १० ते २० टक्के इतकीच होती. उरलेले सर्व जण पुनर्विवाह करण्यास इच्छुक होते.’’
शहरातील सुशिक्षित व सधन वर्गातील लोक म्हणावे तेवढय़ा प्रमाणात विवाहासाठी पुढे येताना दिसत नाहीत. स्वत:चे सामाजिक स्थान जपण्यासाठी शहरांमधील आर्थिक परिस्थिती चांगली असलेले आणि समज असेलेले एड्सग्रस्त लोक यासाठी पुढे येत नाहीत, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे, असेही मत भवाळकर यांनी व्यक्त केले.
एड्सग्रस्तांमध्ये विवाहाचे प्रमाण वाढणे हा बदल सकारात्मक असल्याचे मानव्य संस्थेच्या कार्यकारी संचालिका उज्ज्वला लवाटे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘एड्सग्रस्तांचे आयुर्मान औषधोपचार आणि काळजी घेतल्यामुळे वाढले आहे. तसेच योग्य मार्गदर्शनामुळे स्वत:च्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोनही बदलला आहे. या दोन्ही कारणांमुळे अधिकाधिक लोक विवाहासाठी पुढे येत आहेत. औषधांमुळे आयुर्मान वाढतेच, पण त्यासोबत इच्छाशक्तीचीही आवश्यकता असते. आता मार्गदर्शनामुळेही लोक पुनर्विवाहासाठी पुढे येत आहेत.’’
माझा २००९ मध्ये पुनर्विवाह झाला. जीवन सुसह्य़ व्हायला पाहिजे यासाठी मी पुन्हा लग्न केले. पुनर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे कारण, औषधोपचारांमुळे जीवन वाढते आणि त्यामुळे मनात जगण्याची आशा निर्माण होते.
– नितीन थेऊरकर, पुणे
वर्षांनुसार एड्सग्रस्तांच्या पुनर्विवाहांची संख्या-
२०१०-    ०६
२०११-    १३
२०१२-    ०६
२०१३-    ३८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:20 am

Web Title: aids weddings increase
टॅग Increase
Next Stories
1 ‘आर्यन’च्या शताब्दीनिमित्त रंगला स्नेहमेळावा
2 रिक्षावालेच.. पण तसेही आणि असेही!
3 नाशिकफाटा उड्डाणपूल उद्घाटनासाठी रतन टाटांना निमंत्रण- अजित पवार
Just Now!
X