दुचाकीला धडक मारल्याचा आरोप करीत विनाकारण भांडण काढून एका तरुणाकडील दहा हजार रुपये व मोबाइल लुटणाऱ्या चोरटय़ाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. शंकरशेठ रस्त्यावर ढोले-पाटील चौकामध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती.
करण ऊर्फ बाळा दीपक गोटे (वय २०, रा. महाराष्ट्र तरुण मंडळाजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा आणखी एक अल्पवयीन साथीदार पसार झाला आहे. वैभव गरुड (वय २९, रा. आळंदी) याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुड हा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ढोले-पाटील चौकातून दुचाकीवरून निघाला होता. त्याच्या विरुद्ध बाजूने करण गोटे व त्याचे दोन साथीदार दुचाकीवरून आले. ‘आमच्या दुचाकीला धडक का मारली, त्याची नकसान भरपाई दे,’ असा दम आरोपींनी भरला. मात्र, आपण कोणत्याही दुचाकीला धडक दिली नाही. विनाकारण वाद घालू नका, अन्यथा आपण पोलिसांकडे जाऊ, असे गरुडने त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी गरुड याला मारहाण केली व खिशातील दहा हजार रुपये व मोबाइल काढून घेतला.
घाबरलेल्या आवस्थेत गरुड याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणातील आरोपी गोटे हा कासेवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, वलटे, हवालदार अजय थोरात, अमोल पवार, संतोष मते, अनिकेत बाबर, विजय घिसरे आदींनी ही कारवाई केली.