लोहगाव येथील विमानतळाभोवताली मोठय़ा प्रमाणावर बांधकामे होत असून हवाई दलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय आहे, असे हवाई दलाच्या लोहगाव विमानतळाचे प्रमुख एअर कमोडोर सुरत सिंग यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
हवाई दलाच्या ८१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सिंग यांनी ही माहिती दिली.
विमानतळाच्या सीमाभिंतीपासून १०० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्याचप्रमाणे १०० मीटर ते ५०० मीटर अंतरामध्ये तीन मजल्यांपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम करता येत नाही. परंतु अशी बांधकामे काही प्रमाणात झाली आहेत. या बांधकामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट) घेण्यासाठी दररोज अर्ज येत आहेत. उंच इमारतींमुळे विमानांच्या संदेश वहनामध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे हवाई दलासाठी हा काळजीचा विषय आहे. लोहगाव हा लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचा विमानतळ असल्यामुळे येथे क्षेपणास्त्रांचा साठा आहे. त्यापासून ९०० मीटर अंतरावर निवासी बांधकाम झाल्यास त्या परिसरातील नागरिकांना धोका संभवतो, याकडे सिंग यांनी लक्ष वेधले.
विमानतळ परिसरातील बांधकामांसंदर्भात आम्ही पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत कोणताही मार्ग निघालेला नाही. या संदर्भात २००७ मध्ये एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच्या बांधकामांवर कारवाई करणे शक्य झालेले नाही. २००७ नंतरच्या बांधकामांसंदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसारच योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.