08 March 2021

News Flash

पिंपरीत बीआरटी मार्गावर आता वातानुकूलित बससेवा

शहरात दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू केले आहेत आणि या दोन्ही मार्गाना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अनेक अडचणींवर मात करून पिंपरी महापालिकेने शहरात दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू केले आहेत आणि या दोन्ही मार्गाना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बीआरटी मार्गावर अधिकाधिक प्रवासी मिळावेत यासाठी लवकरच पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने वातानुकूलित गाडय़ा दाखल होणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यासाठी २५० वातानुकूलित गाडय़ा खरेदी करण्याचे महापालिकेचे नियोजन असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यातील काही वातानुकूलित गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील आणि त्या बीआरटीच्या दोन मार्गावर दिल्या जातील.
पिंपरी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटर लांबीच्या बीआरटीचे नियोजन केले आहे. सांगवी-किवळे या साडेचौदा किलोमीटरच्या पहिल्या मार्गाचे उद्घाटन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले. बीआरटी सुरू होण्यापूर्वी या मार्गावरून दररोज ६७ हजार प्रवासी प्रवास करत होते. बीआरटीमुळे ती संख्या ८१ हजारांपर्यंत वाढली. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी नाशिकफाटा-वाकड हा आठ किलोमीटरचा दुसरा मार्गही कार्यान्वित झाला. या दुसऱ्या मार्गावरील प्रवासी संख्येतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यापुढील काळात पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ व्हावी आणि नेहमीच्या वर्गातील प्रवाशांखेरीज अन्य प्रवासीही पीएमपी सेवेकडे यावेत, यासाठी पीएमपीच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित गाडय़ा येणार आहेत. त्यासाठीचा खर्च पिंपरी महापालिका करणार असून या नव्या गाडय़ा केवळ पिंपरी क्षेत्रातच फिरणार आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरावर चार बीआरटी मार्गाचा विचार केला जाणार आहे. सध्या दोनच मार्ग खुले करण्यात आले आहेत. वातानुकूलित गाडय़ा ताफ्यात दाखल झाल्यानंतर पीएमपीला नवे प्रवासी मिळतील, उत्पन्न वाढेल, रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल आणि पर्यायाने वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

** पिंपरी महापालिका हद्दीत चार बीआरटी मार्गाचे नियोजन
** सध्या २२.५ लांबीचे बीआरटीचे दोन मार्ग
** सांगवी ते किवळे- १४.५ किलोमीटर
** नाशिकफाटा-वाकड- ८ किलोमीटर
** सांगवी-किवळे मार्गावरील प्रवासी संख्येत दैनंदिन १४ हजारांची वाढ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2016 3:26 am

Web Title: air conditioned bus chinchwad brt
टॅग : Bus,Chinchwad
Next Stories
1 महाविद्यालयांच्या हिशोबांची तंत्रशिक्षण विभागाकडून झाडाझडती
2 साहित्य संमेलनात ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, साहित्य एकाच ठिकाणी
3 शाळाबाह्य़ मुलांचा पुन्हा शोध
Just Now!
X