पुणे विमानतळावर एक विमान आज धावपट्टीवरून घसरलं. आज संध्याकाळी ६:५० ची ही घटना असून एअर इंडियाचं हे विमान असल्याचं कळतंय. हे विमान  दिल्ली ते पुणे प्रवास करत होतं. AI -८४९ या क्रमांकाच्या या विमानामधून १५२ प्रवासी प्रवास करत  होते आणि हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. हे विमान धावपट्टीवरून घसरल्याच्या वृत्ताला एअर इंडियाने पुष्टी दिली आहे.

कुठलंही विमान उतरल्यावर धावपट्टीच्या एका विशिष्ट भागावर ते उतरावं लागतं. त्या खुणेच्या पुढे ते जाता कामा नये. आजचं हे विमान या खुणेच्या ठिकाणी थांबलं नाही. यावेळी पायलटने ब्रेक लावल्याने विमान ‘स्किड’ झालं त्यामुळे ते घसरत पुढे जात विमानाचं पुढचं चाक रन वे च्या उजव्या भागाच्या बाहेर जात  थांबलं.

यानंतर पुणे विमानतळावरच्या आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या. विमानात बसलेल्या सर्व १५२ प्रवाशांची सुरक्षितता गरजेची असल्याने त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता होती त्यानुसार ‘शूट’ साहाय्याने त्या सर्व  प्रवाशांना विमानांच्या बाहेर काढण्यात आलं. सर्व प्रवासीी सुरक्षित आहेत.

यावेळी वायुदल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली होती. यावेळी विमानातल्या सर्वच्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनल इमारतीत आणलं गेलं होतं.