रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईडतर्फे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर इंधनरहित विमानांचा ‘एअर शो’ आयोजित करण्यात आला आहे. येत्या राववारी (१८ जानेवारी) सकाळी ९ ते ११ या वेळात हा शो होणार आहे. रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या या विमानांची उड्डाणे अनुभवण्यासाठी पुण्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
क्लबचे अध्यक्ष अभय जबडे यांनी ही माहिती दिली. प्रसिद्ध विमान छांदिष्ट सदानंद काळे व त्यांचे देशभरातील विविध सहकारी हा एअर शो सादर करणार आहेत. भारतात जागोजागी सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला पाठिंबा देण्यासाठी तो होणार आहे. पॅरामोटरिंगचे प्रात्यक्षिक , हैदराबादचा ‘रोबो बर्ड’ हा विमानाचा प्रकार अशी कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण असणार आहेत. इंधनरहित एअर शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व अधिक सोप्या पद्धतीने समजेल. कार्यक्रमाच्या मध्यंतरात अभिनेते राहुल सोलापुरकर विद्यार्थ्यांना ‘स्वच्छतेची शपथ’ देणार आहेत, असे प्रशांत शहा यांनी सांगितले.