कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे प्रा. मिलिंद जोशी यांच्या ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे प्रकाशन ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांच्या हस्ते झाले. वक्ता म्हणून गेली १२ वर्षे विविध विषयांवर व्याख्यान देण्याच्या जोशी यांच्या तपपूर्तीनिमित्त मिरासदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव, कॉन्टिनेन्टलच्या संचालिका देवयानी अभ्यंकर, देवेश अभ्यंकर आणि अक्षरधाराचे लक्ष्मण राठिवडेकर याप्रसंगी उपस्थित होते. श्रोत्यांचं लक्ष वेधून घेण्याची शक्ती वक्तृत्वात असावी. लेखकामध्ये वक्तृत्व असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. वक्तृत्व हीदेखील एक कलाच आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केले.
वीणा देव म्हणाल्या, जोशी यांनी प्रतिभावंतांमधील माणूसपणाचा शोध घेतला आहे. डॉ. काळे म्हणाले की, कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. जोशी यांनी दोषांपेक्षा गुणग्राहक वृत्तीने त्या माणसांकडे पाहून त्यांची वक्तिचित्रे या पुस्तकात उभी केली आहेत. प्रा. जोशी म्हणाले, मी माझ्या वडिलांच्या सूचनेनुसार अनेक वक्त्यांची श्रवणभक्ती केल्यामुळे मला ही कला प्राप्त झालेली आहे. देवयानी अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. देवेश अभ्यंकर यांनी आभार मानले.