उद्योगपती आणि पंचशील हॉटेल्स समूहाचे अध्यक्ष अजय चोरडिया यांच्या आत्महत्येच्या विषयाला वेगळे वळण मिळाले असून, पोलीस आता आशिष शर्मा या व्यक्तीच्या शोधात आहेत.
चोरडिया यांनी सोमवारी दुपारी चिंचवडमधील त्यांच्या मालकीच्या ‘डबल ट्री’ हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलीसांना मिळाली असून, या चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्येला केवळ आशिष शर्मा हेच कारणीभूत असल्याचे त्यांनी लिहिलेले आहे. मात्र, आशिष शर्मा नक्की कोण याचा कोणताही उल्लेख चिठ्ठीमध्ये नाही. त्यामुळे चोरडिया यांनी उल्लेख केलेले आशिष शर्मा नक्की कोण, याचा शोध पिंपरी-चिंचवडमधील पोलीस घेत आहेत. आशिष शर्मा नक्की कोण आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
चोरडिया गेल्या सोमवारी दुपारी साडेबारा वाजता चिंचवडमधील ‘डबल ट्री’ हॉटेलमध्ये आले. तेथून ते बाराव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. याच ऑफिसच्या बाहेर दुपारी दीडच्या सुमारास गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. चोरडिया यांना मृतावस्थेत बघितल्यावर हॉटेलमधील कर्मचाऱयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.