भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त पुण्यातील निगडी परिसरात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अजिंक्य रहाणे प्रमुख पाहूणा म्हणून उपस्थित होता.

यावेळी बक्षिस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी अजिंक्य रहाणे उपस्थित होता. “शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माऊंट एव्हरेस्ट आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे”, अशा शब्दांत अजिंक्यने पवारांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आपले विचार मांडले.

अवश्य वाचा – सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत अ संघात स्थान

यावेळी बोलत असताना अजिंक्यने आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी जागवल्या. माझ्या क्रिकेटची सुरुवातही टेनिस क्रिकेटवरच झाली. क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवून पाहणाऱ्या खेळाडूंनी कधीही हार मानू नये असा सल्लाही रहाणेने उपस्थित खेळाडूंना दिला. भारतीय संघाने २०१९ वर्षातला आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. २०२० साली भारत न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारत २ कसोटी सामने खेळणार आहे, ज्यासाठी सरावाकरता अजिंक्यची भारत अ संघातही निवड करण्यात आली आहे.